Mon, Nov 19, 2018 19:04



होमपेज › Satara › फलटण : पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न

फलटण : पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न

Published On: May 11 2018 4:36PM | Last Updated: May 11 2018 4:36PM



फलटण : प्रतिनिधी

अलगुडवाडी ता.फलटण येथील करंज ओढयातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू व्यवसायिकाला पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी शिरजोर झालेल्‍या वाळू व्यावसायिकांकडून पोलिसांच्याच अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुरूवार दि.10 मे रोजी अलगुडवाडी येथील करंज ओढयातून अवैध वाळूचे उत्खनन सुरू असल्‍याची माहिती परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना मिळाली होती. त्‍यानुसार त्यांनी पोलिसांचे पथक कारवाईसाठी घटनास्‍थळी पाठवले. हे पथक सदर ठिकाणी पोहोचले असता, अवैध वाळू व्यवसायिकांनी पोलिसांची चाहूल लागताच वाळू भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली जवळील पाच ते सहा जणांनी पोलिसांवर दगड मारण्यास सुरूवात केली, तसेच पोलिसांनाच धमकी देत, वाळू भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मधून बसून वाळूसह पळून जाऊ लागले. त्यावेळी सहाय्यक फौजदार रासकर व हवालदार भोसले यांनी ट्रॅक्टर अडवीण्याचा प्रयत्‍न केला असता ट्रॅक्टर वरील चालकांने अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथून वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रेलर घेउन या लोकांनी तेथुन पळ काढला. या प्रकारानंतर पोलिसांनी जादा कुमक मागवून कारवाई करत, एक जेसीबी व एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला. या प्रकरणी संशयित आरोपी अक्षय नवनाथ करचे (वय 22) काळूराम गोरख गुंजाळ (वय 24) व सतरा वर्षीय अल्पवयीन बालक सर्व राहणार अलगुडवाडी ता.फलटण यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आर.आर.भोसले करत आहेत.