Sun, Jul 21, 2019 09:52



होमपेज › Satara › फलटणमध्ये मराठा तरुणांचे मुंडण

फलटणमध्ये मराठा तरुणांचे मुंडण

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:47PM



फलटण : प्रतिनिधी

गेल्या दीड वर्षांपासून आरक्षणाची मागणी मराठा समाज करत आहे. मात्र, सरकारकडून फक्‍त टोलवाटोलवी होत आहे. संयम आणि शांततेची भूमिका घेऊनही शासनाने कोणतीच ठोस अशी कार्यवाही केली नाही. त्यामुळे फलटणमध्ये मराठा समाजाच्या वतीने रविवारी मुंडण आंदोलन करण्यात आले. शेकडो तरुणांनी आपले मुंडण करून शासनाचा निषेध नोंदवला. तसेच शासनाचे प्रतीकात्मक श्राद्ध घालून आंदोलनस्थळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

तीन दिवसांपासून फलटणमधील अधिकारगृहासमोर मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. रोज मोठ्या संख्येने शहर व तालुक्यातील मराठा समाजातील नागरिक यामध्ये सहभागी होत आहे. शासनाकडून कोणतेही ठोस आश्‍वासन मिळत नसल्याने या तरुणांनी ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी  रविवारी सकाळपासून आंदोलनस्थळीच मुंडन करुन घेतले.  

शेकडो तरूणांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. यांच्यासमवेत 65 वर्षे वयाचे एक वृध्द गृहस्थही मुंडन करुन घेवून शासनाचा निषेध करण्यात पुढे आल्याने तरुणांचा उत्साह दुणावल्याचे स्पष्ट झाले. केवळ मुंडन करुनच ही मंडळी थांबली नाहीत. यानंतर शासनाचे श्राध्द घालून बोंबाबोंब करत शासनाच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. 

गेली सुमारे 4 दिवसांपासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात फलटण शहराप्रमाणेच तालुक्याच्या विविध भागातील गावांची यादी करुन त्या नियोजनाप्रमाणे दररोज अनेक  गावातील मराठा समाज बांधव या ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत. आंदोलनात ढवळ, वाखरी, घाडगेवाडी, आळजापूर, कोर्हाळे, वडगाव, कापशी, बिबी, मुळीकवाडी, वाठार निंबाळकर, मिर्याचीवाडी, आदर्की, त्याचप्रमाणे या तालुक्यात पुनर्वसित म्हणून दाखल झालेली जोरगाव व गोळेगाव येथील मराठा समाज बांधवही या आंदोलनात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. 

मुंडन आंदोलनात या गावाशिवाय तालुक्यातील अन्य गावातील तरुणवर्गही सहभागी झाल्याने आंदोलन यशस्वी तर झाले आहे. तथापि त्या पाठीमागील शासनाच्या निषेधाची भूमिका शासनकर्ते लक्षात घेत नसल्याने आंदोलनाची तीव्रता वाढत चालली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दुग्धाभिषेक व गाजर वाटप

ठिय्या आंदोलनादरम्यान आंदोलनस्थळी एक मोठा व एक छोटा असे दोन धोंडे प्रतिकात्मक स्वरुपात ठेवून त्यांना दुग्धाभिषेक घालून गाजर वाटप करण्यात येणार असल्याचे आंदोलन स्थळावरुन सांगण्यात आले. या अनोख्या आंदोलनाद्वारे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असल्याचे पहावयास मिळत आहे.