Fri, Jul 19, 2019 18:28होमपेज › Satara › फलटणच्या टोळीला सावकारीप्रकरणी ‘मोका’

फलटणच्या टोळीला सावकारीप्रकरणी ‘मोका’

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 11:36PMसातारा : प्रतिनिधी

फलटण येथील खासगी सावकार सुनील ऊर्फ मुन्‍ना माणिक जाधव याच्या टोळीवर ‘मोका’ लावण्यात आला आहे. त्यामुळे फलटणमध्ये खासगी सावकारीच्या माध्यमातून दहशत निर्माण केलेल्या आणखी एका टोळीला पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी झटका दिला आहे.

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेणार्‍या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्यावर ‘मोका’ लावण्याची धडक मोहीम पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी हाती घेतली आहे. गेल्या दोन वर्षांत 13 ‘मोका’चे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण झाली आहे. अधीक्षकांचा हा ‘मोका’चा झटका बुधवारी फलटण येथील एका खासगी सावकाराला बसला. जास्तीत जास्त टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्माकर घनवट व फलटण पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश सावंत प्रयत्न करत आहेत.

या दरम्यान सुनील जाधव या सावकारावर एका कृत्याबाबत एप्रिल महिन्यात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी हे फलटणमधील महतपुरा पेठेत राहत आहेत. सुनिल जाधव याने तक्रारदार यांना दरमहा 15 टक्के व्याजाने 1 लाख 40 हजार रुपये दिले होते. मात्र पहिल्याच महिन्यात व्याज थकल्याने सप्टेंबर 2016 मध्ये सुनिल जाधव तक्रारदार यांच्या टोळीतील साथीदारांसह घरी गेला होता. त्यावेळी संशयितांनी फिर्यादीला त्याच्या 63 गुंठे जमिनीचे गहाणखत करून मागितले. यावेळी तक्रारदार यांनी त्याला त्याने नकार दिला. तरीही त्याने परस्पर खुषखरेदीचा कागद स्वत:च्या नावावर करून घेतला. याबाबत फिर्यादीच्या वडिलांनी विचारणा केल्यावर त्यांना मारहाण केली. तसेच फिर्यादीची आई घरात एकटी असताना 11 हजार रुपये जबरदस्तीने घेऊन गेले होते. याबाबत हा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या तपासामध्ये सुनिल जाधव हा त्यांच्या टोळीने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी सावकारी, जबरी चोरी सारखे गुन्हे करत असल्याचे समोर आले.

पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार या गुन्ह्याला मोक्काचे कलम लावण्याबाबतचा प्रस्ताव फलटण शहर पोलिसांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला होता. बुधवारी त्यांनी त्याला मंजुरी दिली आहे. आता या मुळ गुन्ह्यात मोक्काचे कलम वाढविण्यात आले. या गुन्ह्याचा तपास फलटणचे उपअधिक्षक डॉ. अभिजित पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. या टोळीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती घेऊन मोक्काची प्रभावी  कारवाई करण्यात येणार आहे.