Wed, Nov 14, 2018 17:42होमपेज › Satara › कुठे अन्नाची नासाडी तर कुठे अनेक उपाशी

कुठे अन्नाची नासाडी तर कुठे अनेक उपाशी

Published On: Feb 10 2018 1:39AM | Last Updated: Feb 09 2018 8:21PMफलटण : यशवंत खलाटे

अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते. स्वच्छ ताटात असेल तर त्याचा स्वाद कधी घेईल असे वाटते, मात्र एकीकडे मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होताना दिसत आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अनेक गरीबांना उपोशीपोटी राहावे लागत आहे. त्यामुळे जर अन्न  शिल्लक राहिल्यास नीट ठेवून सकाळी येणार्‍या उपाशी असणार्‍या भिक्षेकर्‍यांना दिल्यास पूर्णब्रह्य अन्नाचा योग्य तो सन्मान होईल. 

आज भूकबळी जात असल्याच्या अनेक घटना दिसून येतात. मात्र, त्याचवेळी मोठ-मोठ्या लग्न समारंभात, हॉटेल्स तसेच अनेक घरांमधूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेले अन्न टाकून देण्यात येत असल्याचे दिसून येते. दरम्यान, फलटण शहरातील लक्ष्मीनगरात मोठ्या प्रमाणात कुणीतरी अन्न गटारात टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे अनेकांनी खंत व्यक्त केली. 

लग्न व इतर कार्यात भोजनासाठी लोकांना आमंत्रित करण्यात येवून स्वादिष्ट व रुचकर भोजन दिले जाते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर शिल्लक अन्नाची विल्हेवाट सरळ कचराकुंडी अथवा गटारात लावल्याचेही अनेक प्रकार घडत असतात. त्यामुळे एक तर माणसांचा अदमास घेवून जेवण बनवणे, शिल्लक अन्न टाकून न देता गरीब, उपाशी अर्धपोटी लोकांना देणे गरजेचे आहे. शहरात अनेक भागात सकाळी सकाळी अनेक गरीब लोक छोट्या छोट्या मुलांना घेऊन शिळपाकं असेल मागत असतात. तथापि, लोकांना न देता ते जे अन्न शिल्लक राहिलेले अन्न गटारात टाकण्यात येते हे खेदजनक आहे. 

अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असे आपण सांगतो व ऐकतो. ते मिळवण्यासाठी उन्हात पावसात व थंडीत काम करतो, त्यातून मिळणार्‍या पैशातून धान्य, भाजीपाला, तेलमीठ, खरेदी करतो. त्यानंतर कुठे शिजवून कुटुंबातील प्रत्येकजण खात असतो. त्यामुळे या पूर्णब्रह्म अन्नाचा योग्य तो सन्मान करण्यासाठी अन्नाचा प्रत्येक कण कुणाच्या तरी मुखात जाईल, याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे.