Wed, May 22, 2019 23:05होमपेज › Satara › नाव श्रीमंत पण निघाला लाचखोर

नाव श्रीमंत पण निघाला लाचखोर

Published On: Jun 16 2018 1:32AM | Last Updated: Jun 16 2018 1:32AMफलटण : प्रतिनिधी 

निंबळक (ता. फलटण) येथील तलाठी श्रीमंत दिनकर रणदिवे यांना एक हजाराची लाच घेताना पकडले. धक्कादायक बाब म्हणजे नोकरीत असताना दोनवेळा लाचलुचपत विभागाने त्यांना पकडले असून, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यामुळे फलटणमधील लाच घेण्याचे प्रकार पुन्हा वाढू लागले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, एका महिलेने गावठाण क्षेत्रात जागा खरेदी केली होती. यामुळे ही जागा नावावर करण्यासाठी ती महिला रणदिवे यांना वेळोवेळी नोंदीची विनंती करीत होती. मात्र, रणदिवे हे त्या महिलेला पैशांची मागणी करत होते. यामुळे या महिलेने लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली. शुक्रवारी दुपारी पोनि बयाजी कुरळे व इतर अधिकार्‍यांनी सापळा रचला व एक हजाराची लाच घेताना ताब्यात घेतले. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.     

दरम्यान, 2012 साली मार्डी ता.माणमध्ये लाचलुचपत खात्याने  त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्या खटल्यात अजूनही खटाव येथे ती केस स्टॅन्ड झाली नाही तोपर्यंत परत आज लाचलुचपतच्या जाळ्यात रणदिवे सापडला आहे. रणदिवे यांना पुन्हा लाचलुचपत खात्याने पकडले असून सातारा जिल्ह्यातील ही पाहिली घटना ठरली आहे. पहिल्या खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच दुसर्‍या गुन्ह्यात रणदिवे सापडल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे फलटण तालुक्यातील महसूल विभागाची लक्तरे वेशीला टांगण्याचा प्रकार वाढत चालला आहे.