Thu, Apr 25, 2019 17:30होमपेज › Satara › फलटणचे आ. दीपक चव्हाण सुखरूप

फलटणचे आ. दीपक चव्हाण सुखरूप

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 23 2018 11:29PMफलटण : प्रतिनिधी 

पंचायत राज समिती जम्मू-काश्मीरच्या अभ्यास दौर्‍यावर असताना ही समिती अनंतनाग जिल्ह्यातून येताना बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास या समितीमधील आमदारांच्या गाडीवर अतिरेक्यांनी ग्रेनेड हल्‍ला केला. या समितीमध्ये फलटण मतदारसंघातील आ. दीपक चव्हाण यांचाही समावेश होता. या हल्ल्यामध्ये आ. चव्हाण यांच्यासह सर्व आमदार सुखरूप बचावले आहे. दरम्यान, हा हल्‍ला झाल्यानंतर सर्व आमदार वेगाने सुरक्षित स्थळी पोहोचले. 

याबाबत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आ. दीपक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राष्ट्रवादीचे औरंगाबादचे शिक्षक आमदार विक्रम काळे, शिवसेनेचे मानखुर्दचे आ. तुकाराम काते, भाजपचे उमरेडचे आ. सुधीर पारवे, शिवसेनेचे पाचोरा मतदारसंघाचे आ. सुरेश आप्पा पाटील हे पंचायत राज समितीचे सदस्य आहे. हे दि. 19  ते 26 मे या कालावधीसाठी जम्मू काश्मिर येथे अभ्यास दौर्‍यासाठी गेले होते. 

दि. 19 रोजी पहाटे 4 वाजता विमानाने मुंबई येथून लेह येथे रवाना झाले होते. दुपारी 1 वाजता लेहचे जिल्हाधिकारी व समितीच्या आमदारांची बैठक झाली. हॉटेल दि सिंघी पॅलेस येथे अधिकारी, आमदार व कुटुंबियांनी मुक्‍काम केला. दि. 20 व 21 रोजी लेह येथी तलाव, नुब्रा घाटी व प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. दि. 22 रोजी लेह येथून विमानाने श्रीनगर येथे गेले होते. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत जम्मू काश्मिर विधानसभेच्या भगिनी समितीसमवेत बैठक झाली. दुपारी 2 ते संध्याकाळी 7.30 पर्यंत पहेलगाम येथील आडू घाटी, बेताब घाटी, चंदनवाडी, मिनी स्वीस प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. 

बुधवार, दि. 23 रोजी अनंतनाग जिल्ह्यातील गुलमर्ग येथील गंडेला साईट, श्री महादेव मंदिर व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचे नियोजन होते. त्याप्रमाणे गुलमर्ग येथील गंडेला येथे भेट दिली. दुपारी पुन्हा श्रीनगरला जाण्याचा बेत आखण्यात आला होता. तेथून निघल्यानंतर आनंतनाग जिल्ह्यातील लेह लडाख प्रदेशात बीजबिहारी या मुख्यमंत्री मुक्‍ती महंमद सईद यांच्या गावालगतून जात असताना दुपारी 12.30 च्या  दरम्यान अतिरेक्यांनी हल्‍ला केला. या हल्ल्यात वाहनांच्या ताफ्यातील दोन टायर फुटले. तसेच गोळीबारही झाल्याने वाहनांच्या दरवाजाला छिद्रे पडली. मात्र, वाहनातील कोणत्याही आमदार किंवा अधिकार्‍याला इजा झाली नाही. 

मात्र, त्या ठिकाणी असलेले पाच ते सहा जण जखमी झाले असून त्यांपैकी एक जण गंभीर जखमी झाला. या हल्ल्यातून वाचल्यानंतर सर्व आमदारांनी इतर वाहनांची मदत घेत जम्मू काश्मिरच्या विधानसभा अध्यक्ष रवींद्र गुप्‍ता यांची भेट घेतली. यानंतर गुप्‍ता यांनी समितीमधील सर्व आमदारांना अतिरिक्‍त सुरक्षा  दिली. 

दरम्यान, दि. 19 रोजी आ. दीपक चव्हाण हे पत्नी वैशाली चव्हाण, मुलगा आर्यन व मुलगी ऋतुजा यांच्यासह ते दौर्‍यावर गेले होते. गुरूवारी पंचायत राज समिती कामकाज संबंधित जम्मू काश्मीर प्रशासनासमवेत बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्या नंतर श्रीनगर आणि शनिवारी दुपारी जम्मू येथून हे सर्व आमदार मुंबईत परतणार आहेत.

नशीबवान आ. दीपक चव्हाण

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर लोणावळा घाटात मारुतीच्या दर्शनाला जात असताना 2013 मध्ये त्यांच्या गाडीला पाठीमागून एकाने जोरदार धडक दिली होती. सुदैवाने त्यावेळी आ. चव्हाण हे गाडीत नसल्याने ते बचावले. पुन्हा बुधवारी एकदा त्यांच्या गाडीवर ग्रेनेड हल्‍ला झाला. या हल्ल्यातही ते सहीसलामत वाचले आहेत. या घटनेनंतर मतदारसंघामध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, आ. चव्हाण हे सुखरूप असल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला.