Thu, Jun 20, 2019 07:32होमपेज › Satara › सावकारीला कंटाळून उपसरपंचाची आत्महत्या

सावकारीला कंटाळून उपसरपंचाची आत्महत्या

Published On: Aug 19 2018 1:26AM | Last Updated: Aug 18 2018 11:47PMफलटण : प्रतिनिधी 

होळ, ता. फलटण येथील उपसरपंच विनोद बबन भोसले (वय 37) यांनी पाच खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. ज्या सावकारांकडून त्यांनी व्याजाने पैसे घेतले होते त्याची चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, होळ येथील विनोद भोसले हे शुक्रवारी घरातून बाहेर पडले. त्यांचा फोन बंद असल्याने त्यांचा शोध घेतल्यानंतरही ते मिळून आले नाही. त्याच दरम्यान जिंती-खुंटे रोडवर त्यांची दुचाकी दिसली. यापुढे काही अंतरावर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचेनिदर्शनास आले. यानंतर साखरवाडी भागातील लोकांनी  याप्रकाराची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. मात्र, पोलिसांनी माहिती देणार्‍यांना अरेरावी केल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी चिठ्ठीमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर हवालदार टिळेकर यांनी मृतदेह घ्या अन्यथा याची विल्हेवाट लावू, अशी धमकी दिल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यावर ग्रामस्थांनी टिळेकर यांच्या निलंबनाची मागणी केली. 

यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील यांनी जमावाला शांत करत पुढील प्रक्रिया राबवली. मृतदेह झाडावरून खाली उतरवल्यानंतर पँटीच्या एका खिशात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली होती. त्यामध्ये रविराज राजाराम घनवट (रा. राम पार्क अपार्टमेंट जाधववाडी ता.फलटण) याच्याकडून 3 लाख रुपये 15% व्याजाने घेतले होतेे. त्याचे 9 लाख 20 हजार देणे आहे. बाळू मुकुंदा कोळेकर (रा. चव्हाण वस्ती कोराळे खुर्द ता. बारामती) याच्याकडून कडून 3 लाख रुपये 10% व्याजाने घेतले होते. त्याचे 7 लाख रुपये देणे. अनिल चांदगुडे (पूर्ण नाव माहीत नाही) (रा. जिंती नका फलटण) याच्याकडून 1.50 लाख रुपये घेतले होते. त्याचे व्याजासह 3 लाख रुपये देणे आहे. रवींद्र हरिभाऊ काकडे (रा. मंगळवार पेठ, फलटण) याच्याकडून 2 लाख रुपये घेतले होते व त्याचे व्याज 3 लाख 88 हजार रूपये देणे होते. विनोद हणमंत चव्हाण (रा. शेरेवाडी (ढवळ) ता. फलटण याच्याकडून 2 लाख रुपये घेतले असल्याचे नमूद केले आहे. हे सर्व लोक पैशासाठी त्रास देत असल्याचे भोसले यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. 

याप्रकरणी  संजय बबन भोसले यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत अनिल चांदगुडे, रविराज घनवट व अभिषेक रवींद्र काकडे यांना अटक केली. तर बाळू कोळेकर हा तिरुपती बालाजी देवस्थान येथे गेल्याने त्याला ताब्यात घेतले नाही. तर विनोद चव्हाण हा फरार आहे.

दरम्यान, फलटण ग्रामीण  पोलीस स्टेशन अंकित साखरवाडीच्या हद्दीत येणार्‍या अनेक गावात अवैध धंद्यात वाढ  झाली आहे. असे असतानाही हे पोलिस ठाणे नेहमीच बंद असते. याचा प्रत्यय शनिवारीही आला. एवढी मोठी घटना घडली असताना हे कार्यालय बंद होते. या कार्यालयातील कर्मचार्‍यांना कोणत्या गोष्टीचे गांभीर्य आहे की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.