Mon, May 27, 2019 06:42होमपेज › Satara › जिल्हा न्यायालयात ‘ट्रॅप’

जिल्हा न्यायालयात ‘ट्रॅप’

Published On: Aug 22 2018 12:58AM | Last Updated: Aug 22 2018 12:58AMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा न्यायालयातील परवानाधारक याचिका लेखनिक (पीटिशन रायटर) असणारा दत्तात्रय हरिश्‍चंद्र भांबुरे (रा. सातारा) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. धक्‍कादायक बाब म्हणजे न्यायाधीशांची ओळख असल्याचे सांगून ‘दिवाणी’च्या प्रकरणात तुमच्या बाजूने निकाल लावतो, असे सांगून 1 लाख रुपयांपैकी 10 हजार रुपये पहिला हप्‍ता म्हणून ही लाच घेण्यात आली. दरम्यान, न्यायदानाच्या पवित्र ठिकाणी लाचखोरीची कारवाई झाल्याने सर्वांना धक्‍का बसला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील मूळ तक्रारदार यांच्या स्थावर मालमत्तेसंबंधाने सातारा दिवाणी कोर्टामध्ये सन 2012 मध्ये अपील दाखल झाले आहेे. या अपिलाची सुनावणी अतिरिक्‍त सत्र न्यायालयात सुरू आहे. संशयित हा अर्ज लिहून देण्याचे काम पाहत आहे. 

तक्रारदार याला भेटल्यानंतर संशयित दत्तात्रय भांबुरे याने तक्रारदार याला संबंधित कोर्ट (न्यायाधिश) ओळखीचे असल्याचे सांगितले. तुमच्या केसचा निकाल तुमच्या बाजूने लावण्यास सांगतो. यामुळे कोर्टातील तुमचे हेलपाटे वाचतील, असे सांगून त्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) तक्रार दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर मंगळवारी पैसे घेण्याचे ठरले. यामुळे एसीबी विभागाने सापळा लावला. मंगळवारी दुपारी संशयित दत्तात्रय भांबुरे याने 10 हजार रुपये लाचेची रक्‍कम स्वीकारताच एसीबी विभागाने रंगेहाथ पकडले. जिल्हा न्यायालयात एसीबीचा ट्रॅप झाल्याचे समजताच एकच खळबळ उडाली. 

एसीबी विभागाने जिल्हा न्यायालयातील प्राथमिक कारवाई केल्यानंतर संशयिताला एसीबीच्या कार्यालयात आणले. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. बुधवारी संशयिताला जिल्हा न्यायालयात हजर केेले जाणार आहे. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही  लाचेची मागणी झाल्यास त्यांनी 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बयाजी कुरळे, पोलिस हवालदार भरत शिंदे, विजय काटवटे, संजय अडसुळ, विनोद राजे, प्रशांत ताटे, अजित कर्णे, संभाजी काटकर, विशाल खरात, श्रध्दा माने, कुलकर्णी यांनी केली.