Sun, Mar 24, 2019 17:22



होमपेज › Satara › तारळे विभागात राष्ट्रवादीला गटांतर्गत नाराजीचे ग्रहण

तारळे विभागात राष्ट्रवादीला गटांतर्गत नाराजीचे ग्रहण

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 8:05PM

बुकमार्क करा




पाटण : गणेशचंद्र पिसाळ

तारळे जिल्हा परिषद  मतदारसंघ हा कधी आ. शंभुराज देसाई यांचा तर कधी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या राजकीय विचारांचा बालेकिल्ला ठरला जातो. यावेळी जि. प. व पं. स. निवडणूकीत येथे पाटणकर गटाला घवघवीत यश मिळाले मात्र त्यानंतर येथे गटांतर्गत गटबाजीमुळे राजकीय तोट्याची लक्षणे वाढली आहेत. राजकीय व सहकारी पदाधिकार्‍यांची मांदियाळी असणार्‍या याच मतदारसंघात नक्की’ कोणाची चूक आणि बरोबर कोण? ’ हे शोधून त्यावर वेळीच उपाययोजना कराव्यात अशा अपेक्षा निष्ठावंतांतून व्यक्त होत आहेत. 

2009 ची विधानसभा व 2012 च्या जि. प. व पं. स.  निवडणुकीत पाटणकर गटाने येथे अनपेक्षित यश मिळविले. तर गटांतर्गत गटबाजीमुळे 2014  मध्ये पराभवही चाखला. या पराभवानंतर 2017 मध्ये जि. प. सह दोन्ही पं. स. जागांवरही विजय मिळविला. येथे जि.प. महिला व बालकल्याण सभापती पदासाठी सौ. संगीता खबाले पाटील तर पं. स. सभापती साठी सौ. रेश्मा जाधव व उपसभापती साठी विलासराव देशमुख यांची मागणी होती. मात्र राजकीय परिस्थिती पाहता पहिल्या टप्प्यात हे शक्य झाले नाही मात्र यानंतर ते होणारच नाही असेही नाही. परंतु या निवडीनंतर येथे आलेली राजकीय मरगळ निश्‍चितच पक्षासाठी घातक असल्याचे चित्र आहे. 

या विभागात जि.प., पं.स.व्यतिरिक्त हणमंतराव खबाले पाटील हे खरेदी विक्री संघात व्हा.चेअरमन तर सचिन सुतार, महेंद्र मगर, भानुदास सावंत हे संचालक आहेत. तर बाजार समितीत अभिजीत जाधव, सुहास माने संचालक असून आता बाजार समिती पदाधिकारी निवडीत अभिजीत जाधव इच्छुकही आहेत. कोयना शिक्षण संस्थेत माजी पंचायत समिती सभापती साहेबराव देशमुख, शिलासिंग राजेमहाडीक यांच्यासारखे अनुभवी मंडळी आहेत.तरीही गटाची गटांतर्गत पिछेहाट ही निश्‍चितच आत्मचिंतन व 

आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. वास्तविक सुरूवातीला सदस्य होताना नेत्यांसमोर अनेक अडचणी असताना व संबंधितांना स्थानिक पातळीवरच विरोध असतानाही धाडसाने ही पदे देऊन इतरही निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना थांबविले त्यांची नाराजी ओढावून घेतली. मात्र तरीही खालचे पद मिळाले तर मग वरचे का नाही ? म्हणून हे रुसवे फुगवे सार्वत्रिक तोट्याचे व संबंधीतांनाही भविष्यात अडचणींचे ठरणार याचाही विचार होणे गरजेचे आहे.