होमपेज › Satara › तुम्ही व्हा, नाहीतर मीच आमदार

तुम्ही व्हा, नाहीतर मीच आमदार

Published On: Mar 15 2018 1:21AM | Last Updated: Mar 14 2018 8:17PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

सन 1952 ते अगदी चालूच्या 2018 या तब्बल 66 वर्षांचा प्रदीर्घ राजकीय काळ पाहाता येथे कायमच देसाई व पाटणकर या दोनच घराण्यांनी पाटण मतदारसंघावर राज्य केले आहे. तिसरी आघाडी, शक्ती व व्यक्तीही जागेवरच मोडीत निघाल्याने मग अजूनतरी काही वर्षे या दोनच घराण्यांचा प्रभाव येथे चालणार हे कटूसत्यही नाकारून चालणार नाही. 

सामान्य मतदार, कार्यकर्ते ते अगदी पदाधिकारी यांच्यातील राजकीय युद्ध तर नेत्यांमधील आरोप, प्रत्यारोप व श्रेयवाद जगजाहीर आहेत. परंतु ज्यावेळी हेच नेते एकाच व्यासपीठावर येतात त्यावेळी निष्ठावंत मात्र निश्‍चितच बुचकळ्यात पडतात. आणि मग पाटणकर नाहीतर देसाई व देसाई नाहितर पाटणकर हेच सुत्र येथे अनुभवायला मिळते. 

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणार्‍या याच तालुक्यात देसाई, पाटणकर गटाची कट्टरता जगजाहीर आहेच. मात्र मावळे कट्टर करताना सेनापतींनी आजवर आपापले गड राखताना येथे तिसरा सेनापतीच जन्माला येवू नये याची पुरेपूर काळजी व खबरदारीही घेतली आहे. चव्हाण घराण्यानंतर येथे सन 1952 ते 1983 या प्रदीर्घ काळात लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी या तालुक्याची सुत्रे एकहाती सांभाळली. त्याकाळात लोकनेत्यांचे सहकारी असणार्‍या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी 1980 साली जनतेच्या विश्‍वासातून राजकीय बंड केले. तर लोकनेत्यांच्या निधनानंतर 1983 ते 2004 व पुन्हा 2009 ते 2014 या काळात सत्ता काबीज ठेवली. याच काळात देसाई घराण्यातील दुसर्या पिढीतील स्व. शिवाजीराव देसाई, श्रीमती विजयादेवी देसाई व त्यानंतर तिसर्‍या पिढीतले व सध्याचे विद्यमान आ. शंभुराज देसाई यांनी पाटणकरांना शह दिला. यात देसाई यांच्या दुसर्‍या पिढीला अपयश आले. मात्र आ. देसाई यांनी 2004 साली विक्रमसिंह पाटणकर तर 2014 मध्ये पाटणकर घराण्याच्या दुसर्‍या पिढीतील युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. त्यामुळे गेल्या 66 वर्षांत अगदी विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद ते अगदी ग्रामपंचायत असो सत्ता मात्र याच दोन घराणी व गटांभोवती घुटमळत राहीली हे निश्‍चितच आहे. 

याच दरम्यान अन्य पक्ष, नेते अथवा याच दोन गट अथवा घराण्यांकडून दुखावलेल्या काहींनी तिसरी शक्ती, पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न झालाही मात्र योग्य वेळी त्याचा फायदा व गैरफायदा घेत येथे सत्ताबदल झाले पण ते दोन घराण्यातच. वाडा व साखर कारखाना या दोन महत्वपूर्ण केंद्रबिंदूवरून याच विधानसभा मतदारसंघात आपापले राजकारण शाबूत ठेवण्याची कला ही दोनच घराणी करू शकतात हेही स्विकारण्याशिवाय पर्यायच नाही. कारण तब्बल आठ व भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या खोर्‍यात ढेबेवाडीच्या माणसाने कोयना तर तारळ्याच्या जनतेने कुंभारगाव पाहिले नाही. तरीही यावर कब्जा याच मान्यवरांनी कायम ठेवला हे राजकीय कौतुकच. 

 त्यामुळे गेल्या साठ वर्षांतील भूतकाळ सध्याचा वर्तमान किंवा उद्याचा भविष्यकाळ तूर्तास तरी येथे आ. देसाई व पाटणकर या दोनच घराण्यांनी राजकीय चलती आहे हे नाकारून चालणारच नाही.