Tue, Apr 23, 2019 13:43होमपेज › Satara › पाटण पंचायत सदस्यांचा असाही ‘व्हॅलेंटाईन’ डे

पाटण पंचायत सदस्यांचा असाही ‘व्हॅलेंटाईन’ डे

Published On: Feb 16 2018 1:49AM | Last Updated: Feb 15 2018 11:10PMपाटण  : गणेशचंद्र पिसाळ

व्हॅलेंटाईन म्हणजे केवळ प्रेम व्यक्त करण्याचा दिवस अशी संकल्पना दोघांनी मोडीत काढली. पाटण पंचायत समिती सदस्य संतोष गिरी व सुरेश पानस्कर यांनी याच दिवशी एचआयव्हीने मृत्यू पावलेल्या आई-वडिलांची दोन अनाथ बालके दत्तक घेऊन माणुसकीतील प्रेमाचा आदर्श घालून दिला आहे. पाटण पंचायत समितीची सभा  म्हणजे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व आ. शंभुराज देसाई या दोन्ही गटांतील पदाधिकारी व सदस्यांसाठी राजकीय आखाडाच असतो. मात्र, यावेळची मासिक बैठक  एका वेगळ्या व चांगल्या कामाने गाजली. 

एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाचा आढावा सुरू असताना आ. शंभूराज देसाई गटाचे सुरेश पानस्कर यांनी पाटण शहरातील एका अंगणवाडीत आई, वडिलांचा एचआयव्हीने मृत्यू झाल्याचे मात्र वैद्यकीय चाचणीत निरोगी असणार्‍या त्यांच्या दोन मुलांना अंगणवाडीत प्रवेश नाकारल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हा विषय त्यांनी सभागृहात जेवढ्या पोटतिडकीने मांडला तेवढ्याच  
आत्मियतेने त्यांनी त्या बालकांच्या भविष्याविषयी जागरुकता दाखवली.

आजवर केवळ आरोप, प्रत्यारोप होणार्‍या या सभागृहात सुरेश पानस्कर यांनी हा प्रश्‍न मांडला त्याचवेळी देसाई गटाचेच दुसरे सदस्य संतोष गिरी यांनी याला कर्तव्याची जोड देत यापैकी एक बालक मी दत्तक घेतो, असे जाहीर केले. दुसर्‍या बालकाचे पालकत्व सुरेश पानस्कर यांनी स्वीकारले. काही क्षणातच या दोन्ही अनाथ बालकांना पालक मिळाले.  तालुक्यात कोणत्याही गोष्टीत राजकारण शोधण्याची किड लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.गटातटामुळे मने दुभंगली. लग्नच काय अगदी अंत्यसंस्कार, रक्षाविसर्जन विधीला जातानाही राजकीय गट पाहणार्‍या या मंडळींनी प्रसंगी रक्ताची गरज असतानाही रक्तापेक्षा राजकीय गट बघूनच रक्त स्वीकारण्याचा करंटेपणा केला आहे. 

मात्र एड्सने आई- वडीलांचा मृत्यू  झाल्यानंतर अनाध झालेल्या या बालकांचे पालकत्व मोठ्या मनाने स्वीकारून सुरेश पानस्कर व संतोष गिरी यांनी राजकारणापेक्षा मानुसकी श्रेष्ठ आहे, हेच दाखवून दिले आहे. प्रेमाची आदर्श शिकवण देणारा व्हॅलेंटाईन डे, यापेक्षा अधिक चांगला साजराच होवू शकत नाही.