Tue, May 21, 2019 04:42होमपेज › Satara › हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी. . !

हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी. . !

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 7:44PM

बुकमार्क करा
पाटण : गणेशचंद्र पिसाळ 

हे भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी... मी राष्ट्रवादी...या गाण्याप्रमाणेच पाटण विधानसभा मतदारसंघातील राजकारण सध्या राष्ट्रवादीच्या सकारात्मक विचारप्रणालीकडे वाटचाल करीत आहे. आगामी आमदार राष्ट्रवादीचाच याची खात्री आणि विश्‍वासही प्रभू श्रीरामाच्या पावनभूमीत मान्यवर नेत्यांनी दिला आहे. सध्याच्या व भविष्यातील आमदारांचा चाफळ मुक्कामी भरलेला हा मेळा निश्‍चितच या मतदारसंघासाठी राजकीय प्रेरणा देणारा आहे. आ. नरेंद्र पाटील, सारंग पाटील आणि सत्यजितसिंह पाटणकर या त्रिरामांचा श्रीरामाच्या चरणी निर्धार याकडे आता सर्वांच्यांच नजरा लागल्या आहेत. 

पाटणच्या राजकारणाने गेल्या काही वर्षांत अनेक राजकीय उलथापालथी पाहिल्या आहेत. तर अंतर्गत कुरघोड्याही. येथे कोणाची लाट याहीपेक्षा राष्ट्रवादी अंतर्गत मतभेदांमुळे एकमेकांची वाट लागली. जर पक्षांतर्गत कुरघोड्या झाल्या नसत्या तर निश्‍चितच राष्ट्रवादीच्या आमदारांचा येथे पाऊस पडला असता. तर जोडीला याच तालुक्याचे सुपुत्र असणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषद आ. आनंदराव पाटील यांचीही साथ लाभली असती हेही नाकारून चालणार नाही. येथे सध्या राष्ट्रवादीतून विधानपरिषदेत नरेंद्र पाटील आमदार आहेत. तर राष्ट्रवादीच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष सारंग पाटील यांचा विधानपरिषदेत निसटता पराभव झाला. तर तीच पराभवाची स्थिती विधानसभा निवडणुकीत युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनीही अनुभवली. 

एकूणच काय ज्यावेळी पक्षांतर्गत एकवाक्यता नसते त्याचे दुष्परिणाम या मान्यवरांनी अनुभवले. मात्र झालेले मतभेद असोत की मनभेद हे सगळे विसरून पुन्हा नव्या जोमाने ही मंडळी पक्षबांधणीत उतरल्याचे नमुने गेल्या काही महिन्यात पहायला मिळाले. याच एकवाक्यतेमुळे पंचायत समितीची निर्विवाद सत्ता, जिल्हा परिषद ते अगदी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीतही राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले. 

नुकत्याच चाफळ येथे जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्यासह प्रभू श्रीरामाला समोर ठेवत विधानपरिषद सभापती ना. रामराजे निंबाळकर आदी मान्यवरांच्या साक्षीने याच ’ त्रिरामां’ ची एकवाक्यता निश्‍चितच पक्षासाठी ऊर्जात्मक ठरेल यात शंकाच नाही असेच सामाजिक मत बनले आहे.