Fri, Apr 19, 2019 08:16होमपेज › Satara › कोयनेत 76.59 टीएमसी पाणी

कोयनेत 76.59 टीएमसी पाणी

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 02 2018 11:26PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षपूर्तीला आता केवळ तीनच महिने शिल्लक आहेत. या महत्त्वपूर्ण अशा उन्हाळ्याच्या कालावधीत धरणात तब्बल 76.59 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठीचाही आरक्षित 31.27 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे या उन्हाळ्यात अगदी सरासरीच्या दुपटीने जरी वीजनिर्मिती केली व पूर्वेकडे सिंचनासाठी अधिकाधिक पाणी वापरले तरीही ‘कोयना’ धरणाबाबत पाण्याची कोणतीच चिंता आता उरलेली नाही.  105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या या धरणातून आत्तापर्यंत पश्‍चिमेकडील वीजनिर्मिती साठी 36.23 टीएमसी पाणीवापर झाला आहे. तर आरक्षित कोट्यापैकी 31.27 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. येथे वीजनिर्मितीसाठी दरमहा सरासरी 5.50 टीएमसी पाणीसाठा वापरला जातो,     

त्यामुळे मग उर्वरित तीन महिन्यांच्या महत्वपूर्ण गरज व मागणी याकाळात येथे सरासरीपेक्षा दुपटीने वीजनिर्मिती करणे शक्य आहे.  सिंचनासाठी गेल्या दोन वर्षांपासून अधिक पाणीवापर होवू लागला आहे. सरासरी वर्षाला 34 ते 35 टीएमसी पाणीवापर झाला होता. चालूवर्षी आत्तापर्यंत सिंचनासाठी 15.14 टीएमसी पाणीवापर झाल्याने यापूढील काळात जवळपास 20 टीएमसी पाणीवापर झाला तरीही याबाबत चिंतेचे कारण नाही.

गतवर्षीपेक्षा चालूवर्षी धरणात तब्बल आजपर्यंत 20 टीएमसी ज्यादा पाणीसाठा शिल्लक आहे. तर त्या तुलनेत पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 15 टीएमसी कमी तर सिंचनासाठी 1.70 टि. एम. सि जास्त पाणी वापरण्यात आले आहे.  सध्या धरणात एकूण 76.59 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यातून आगामी काळातील पश्‍चिम वीजनिर्मितीचे आरक्षित 31, पूर्वेकडील सिंचनासाठी 20, मृतसाठा 5 असे एकूण 56 टीएमसी पाणी वगळता येणार्‍या नव्या तांत्रिक वर्षासाठी जुन महिन्याच्या सुरुवातीला येथे सुमारे अकरा टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहू शकतो हे सध्याचे तांत्रिक चित्र कोयना धरणाबाबत स्पष्ट होत आहे.