Mon, Jan 21, 2019 06:48होमपेज › Satara › अंगावर पेट्रोल ओतून  वृद्ध महिलेला पेटविले

अंगावर पेट्रोल ओतून  वृद्ध महिलेला पेटविले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पाटण : प्रतिनिधी

अंगावर पेट्रोल व डिझेल ओतून वृद्ध महिलेला पेटविल्याची घटना अडूळ (ता. पाटण) येथे गुरुवारी (दि. 29) घडली. यामध्ये अमरावती सखाराम चव्हाण (वय 65, रा. आडूळ) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एकावर पाटण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत पोलिसांनी सांगितले की, अडूळ येथील अमरावती सखाराम चव्हाण यांच्या मालकीची शेतजमीन एका कंपनीने भाडे तत्त्वावर रस्त्याच्या कामासाठी आणलेले साहित्य  व खडी ठेवण्यासाठी घेतली आहे. या ठिकाणाहून टँकर व इतर वाहनामधून घेऊन जात असतात. त्या वाहनांचा त्रास अमरावती यांना होत होता.

याबाबत अमरावती चव्हाण यांनी त्रास होत असल्याचे वारंवार वाहन चालक व इतर लोकांना विनंती करून सांगितले होते. गुरुवार दि. 29 मार्च रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास त्यातील  एका टँकर चालकाने अमरावती यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बाजूला पळाल्याने त्या बचावल्या. त्यानंतर टँकरमधून दोघे-तिघेजण खाली उतरुन त्यातील एकाने डिझेल व पेट्रोलचा कॅन हातात घेऊन अमरावती यांच्या अगांवर तेल टाकून त्यांना पेटवून दिले.

यामध्ये त्या 75 टक्के भाजल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारादरम्यान अमरावती चव्हाण यांनी दिलेल्या जबाबावरून एका कंपनीच्या कामगारावर पाटण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे अधिक तपास करीत आहेत. 
 


  •