Wed, Jul 17, 2019 18:33होमपेज › Satara › पाटण कडकडीत बंद

पाटण कडकडीत बंद

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 11:02PMपाटण : प्रतिनिधी 

नवी मुंबईतील मराठा आंदोलनावेळी रोहन तोडकर याची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ पाटण (जि. सातारा) येथे शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. कराड - चिपळूण राज्यमार्गासह ठिकठिकाणी मार्गावर पेटवलेले टायर तसेच लाकडी ओंडके टाकून वाहतूक विस्कळीत करण्यात आली होती. तसेच पाटणमधील शोकसभेत आरक्षणासह तोडकर कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

खोनोली (ता. पाटण) येथील रोहन तोडकर यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी पाटण बंदची हाक दिली होती.  निसरे फाटा, नवारस्ता, आढूळ, शिंगणवाडी, वाघजाईवाडीसह तालुक्यातील ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. नवारस्ता येथे टायर पेटवून कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक विस्कळीत करण्यात आली होती. तर आढूळ येथे याच मार्गावर लाकडी ओंडके टाकण्यात आले होते. शिंगणवाडी, वाघजाईवाडी परिसरातही टायर पेटवून रस्त्यावर टाकण्याचे प्रयत्न झाले. याशिवाय, कोयनानगर येथेही शाळांना सुट्ट्या देत कडकडीत बंद पाळण्यात आला.

निसरे फाटा येथील आंदोलनात शिवसेना आमदार आ. शंभूराज देसाई यांनी सहभाग घेतला होता. तर पाटणमध्ये रोहन तोडकर याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते.