Wed, Apr 24, 2019 12:30होमपेज › Satara › पाटण तालुक्यात सध्या  जुळून येती राजकीय गाठी

पाटण तालुक्यात सध्या  जुळून येती राजकीय गाठी

Published On: Dec 20 2017 1:44AM | Last Updated: Dec 19 2017 11:06PM

बुकमार्क करा

पाटण ः गणेशचंद्र पिसाळ

देशात, राज्यात ज्याप्रमाणे राजकीय समीकरणे वेगाने बदलायला लागली आहेत त्याचप्रमाणे पाटण तालुक्यातीलही राजकारण एका नव्या वळणावर वाटचाल करीत आहे. राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या अलीकडच्या काळातील भेटींना चांगलेच राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. तर भविष्यातील राजकारणाची सकारात्मक नांदी म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. निश्‍चितच सारंग पाटील आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्या या ‘जुळून येती राजकीय गाठीं’ ची खुमासदार चर्चा येथे आहे. 

राष्ट्रवादीसह या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही जोडी एकत्रीत यावी यामुळे स्वाभाविकच यांचे पिताश्री सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील व माजी सार्वजनिक बांधकाम  मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या योगदानालाही पुन्हा अच्छे दिन येतील असेही सामाजिक मत बनले आहे.  पाटण तालुक्याच्या महत्वपूर्ण सार्वत्रिक विकासात आमदार व मंत्री म्हणून विक्रमसिंह पाटणकर यांचे तर खासदार म्हणून श्रीनिवास पाटील यांचे योगदान सर्वांनीच अनुभवलेले आहे.

 तर हे सत्तेत नसल्यावरचे चटकेही निष्ठावंतांसह सामान्यांनीही सोसले आहेत . राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.  शरद पवार असोत किंवा पक्षातील अन्य मान्यवर येथील दोन्ही नेत्यांच्या पक्षनिष्ठा व विश्‍वास याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.तर तीच परंपरा याच नेत्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही मिळाली आहे. मात्र काहीकाळापूरते का होईना पण मतभेद असो किंवा मनभेद हे कोणालाही न परवडणारेच ठरले यात शंकाच नाही. तर विकास असो अथवा प्रकल्प, उद्योग, रोजगारनिर्मिती यासह पुढच्या पिढ्यांना आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञान यात या दोन्ही युवा नेत्यांचा हातखंडाच आहे. तर आज तालुक्यात वाढलेल्या सुशिक्षित, बेरोजगारीवर निश्‍चितच हे मनोमिलन उत्तम उपाय व नवसंजीवनी ठरू शकते. त्यामुळे हे दोन तरूण नेते व त्यांच्यामुळे त्यांच्या व तालुक्याच्या कायम पाठीशी रहाणारे दिग्गज पिताश्री यांच्याकडून पुन्हा तालुक्यात अच्छे दिनाच्या सार्वत्रिक अपेक्षा आहेत.