Thu, Jul 18, 2019 14:23होमपेज › Satara › वयोवृद्ध प्रकल्पग्रस्तास आली चक्‍कर

वयोवृद्ध प्रकल्पग्रस्तास आली चक्‍कर

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 10:51PMपाटण : प्रतिनिधी

शासनाच्या दुर्लक्ष आणि पुनर्वसनात झालेल्या निष्काळजीपणाविरूद्ध गेल्या सात दिवसांपासून कोयनानगर येथे प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण सुरू आहे. रविवारी देवघर (ता. पाटण) येथील उपोषणकर्ते कृष्णा रामजी सपकाळ (वय 78) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.  कोयना प्रकल्पग्रस्तांनी 26  फेब्रुवारीपासून विविध मागण्यांसाठी कोयनानगर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. रविवारी सातव्या दिवशीही हे उपोषण सुरूच होते. कोयना धरण होऊन तब्बल 60 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र तरीही अद्याप या प्रकल्पासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणार्‍या प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून न्याय मिळालेला नाही. या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, महसुली गावे, गावठाण, शासकीय नोकर्‍या तसेच नागरी सुविधांचे प्रश्‍न आजही कायम आहेत. 

त्यामुळेच आक्रमक भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. मात्र गेल्या सात दिवसात शासन अथवा प्रशासकीय पातळीवर तितक्याच गांभीर्याने अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. केवळ काही ठराविक कनिष्ठ अधिकारी पाठवून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून केला जात आहे. दरम्यान रविवारी कृष्णा सपकाळ हे आंदोलनस्थळी चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांना तातडीने हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पाटणला हलवण्यात आले. आमरण उपोषणास प्रारंभ केल्यानंतर सात दिवसानंतरही शासनासह प्रशासनाला प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कोणतेही लोकप्रतिनिधीही गांभिर्याने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे पहात नाहीत, असा दावा करत प्रकल्पग्रस्त तीव्र भावना व्यक्त करत असल्याने भविष्यात आंदोनल चिघळणार की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.