Thu, Apr 25, 2019 13:43होमपेज › Satara › पाटण एसटी आगाराचे नूतनीकरण ‘खड्ड्यात’

पाटण एसटी आगाराचे नूतनीकरण ‘खड्ड्यात’

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 9:52PMपाटण :गणेशचंद्र पिसाळ 

बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी  कधी सात, कधी तीन तर कधी दीड कोटी, अशी कोट्यवधींच्या आश्‍वासनांची उड्डाणे घेणारा पाटणचा एस. टी. आगार अजूनही खड्यातच आहे. 

या खड्यांमुळे बसेस बरोबरच प्रवाशांचेही कंबरडे मोडले आहे. तर प्रशिक्षणार्थी आगारप्रमुख हे कचरा व दुर्गंधीत अडकले आहेत. वरिष्ठ अधिकारी रजेवर तर कंडक्टरना सोबत घेऊनही या आगाराची गाडी पुढे जात नसल्याचे चित्र पाटण येथे पहायला मिळत आहे. 

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एस. टी. अलीकडे प्रवाशांच्या गैरसोयींचीच ठरत आहे. पाटण आगाराची दैना काही वेगळीच अनुभवास येत आहे. येथे गेली काही वर्षे केवळ निधी मंजूरीच्या घोषणा, अश्‍वासनांच्या पलीकडे आगार व प्रवाशांच्या पदरात काहीच पडले नाही. यापूर्वी कधी सात तर कधी तीन ते अडीच कोटी व सरतेशेवटी दिड कोटी मंजूर झाल्याच्या वावटळ्या ऐकीवात आहेत. मात्र त्यापैकी एका रूपयांचेही काम  झालेले नाही. शिवाय येथील दैनंदिन अवस्था अधिकाधिक बिकट होत चालली आहे. या परिसरात  खड्यांचे साम्राज्य आहे. ते खड्डे भरल्यानंतर अंतर्गत रस्त्याची पूरती वाट लागली आहे. यामुळे याच एस टी बसेस सह अगदी प्रवाशांचेही कंबरडे मोडत आहे. कचरा, दुर्गंधी आणि झुडपांचे साम्राज्य आहेच.प्रवाशांबरोबर स्वतः आगार प्रमुखही या यातना भोगत आहेत. जे अधिकारी स्वतःची सोय करू शकत नाहीत ते प्रवाशी अथवा कामगारांना काय न्याय देणार? 

येथे प्रशिक्षणार्थी आगारप्रमुख आहेत. तर बहुतेक अधिकारी रजेवर असल्याने कंडक्टरना सोबत घेऊन येथे अनेकदा कामकाज करायला लागत आहे. लांब पल्याच्या पुण्याला जाणार्‍या आठही गाड्या बंद केल्या. मुंबईला खाजगी पंचवीस बसेस रोज जातात मात्र पाटण आगाराची एकच बस चालू आहे. त्यामुळे खाजगी बसेस चालतात तर एसटी मागे का याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.  
आगार म्हणजे फुकटचा वाहनतळ आणि गेटवरच वडाप वाल्यांसाठी सोयीचे ठिकाण ठरत आहे. याचे आगार व्यवस्थापनाला देणेघेणी नाही. भरडला जातोय तो सामान्य प्रवाशी.