Thu, Apr 25, 2019 12:09होमपेज › Satara › उन्हाळ्यातही गारवा देणारा  कोयनेचा निसर्ग

उन्हाळ्यातही गारवा देणारा  कोयनेचा निसर्ग

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 8:46PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

खरं तर उन्हाळा म्हटलंकी डोळ्यासमोर उभं रहातं ते रखरखीत, कडक आणि शरीराची दाहकता वाढविणारं चित्र. मात्र त्याचवेळी दुसरीकडे थंडगार माठं, कलिंगड, आंबा, फणस, काजू, करवंद जांभळ,आळू आदी अनेक फळे आठवलीकी मग त्या रखरखत्या उन्हातही आपोआपच मानसिक गारवा निर्माण होतो तेही तितकेच सत्य. त्यामुळे या भर ऊन्हातही गारवा पाहिजे असेल तर मग कोयनेच्या निसर्गाचा लाभ घ्यायलाच पाहिजे. 

कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असणार्‍या पाटण तालुक्यात पावसाळ्यात जेवढं निसर्ग सौंदर्य खुलत त्याचपटीत याच निसर्गाच्या सान्निध्यात उन्हाळ्यातील पर्यटन अथवा फळांचेही गोडवे तितकेच मधूर आहेत. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागताच याच परिसरातील कलिंगड व कोवळ्या काकडीला प्रचंड मागणी वाढली आहे. दुपारच्या वेळेला काकडी तर रात्री जेवन झाल्यावर अंगणात आपल्याच कुटुंबीयांसोबत त्या कलिंगडाची गोडी ही निश्‍चितच सार्वत्रिक गारवा निर्माण करते. याच दिवसात हॉटेलपेक्षाही घरात केलेला डबा घेऊन नदीकाठच्या हिरव्यागार झाडांखाली जेवणाची मजा ही फाइव्ह स्टार हॉटेलनाही मागे टाकते.

याबरोबरच कोयना नदीपात्रात एखादी डुबकीही शरीरच काय पण मनालाही अल्हाददायी ठरते. पर्यटनाचे महत्त्व वाढतच चालल्याने मग सकाळच्या वेळी जंगल सफारी, नानाविध जातींचे दुर्मिळ पक्षी पहाण्याची संधी, दुपारी मनसोक्‍त नदीत पोहण्यासह आधुनिक व पारंपरिक मासेमारीची नदीपात्रातील मजा काही औरच असते. यासह अ‍ॅडव्हेंचर पार्क, नाईट सफारी यामुळे कोयना परिसर अलीकडे पर्यटकांचा महत्वपूर्ण केंद्रबिंदू ठरत आहे. अगदी मुंबई, पुणे यासह सांगली, कोल्हापूर या परिसरातील पर्यटकांमुळे कोयना भर उन्हाळ्यातही फुलू लागली आहे.

यासह आता याच विभागातील आंबा, फणस, काजू, करवंद, जांभळं या फळांचीही रेलचेल सुरू होईल. निश्‍चितच अन्य ठिकाणी नकोनकोसा वाटणारा उन्हाळा पाटण तालुक्यात आल्यावर निश्‍चितच हवाहवासा वाटेल यात शंकाच नाही. अनेक नैसर्गिक ठिकाणे, दुर्मिळ प्राणी, पक्षी व सोबतीला अखंड वाहणारी कोयना नदी,  सुमधूर फळे त्यामुळे या बाबी आणि सोबतीला सुट्ट्यांच्या बोनस मिळवायचा असेल तर मग इकडे यायलाचं पाहिजे . आणि कोयनाही तुमच्याच प्रतिक्षेत आहे हे विसरू नका.