होमपेज › Satara › कोयनेच्या पाण्यावर तेलंगणाचा ‘डोळा’

कोयनेच्या पाण्यावर तेलंगणाचा ‘डोळा’

Published On: Jun 20 2018 1:16AM | Last Updated: Jun 19 2018 11:25PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

संपूर्ण जगाला पाण्याचे दुर्भिक्ष आणि महत्त्व पटले आहे. त्याचवेळी पाण्यासाठी तिसर्‍या महायुद्धाच्या शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत. नेमक्या याच गोष्टींची हळूहळू प्रचितीही यायला सुरुवात झाली आहे. तेलंगणा राज्याला असणारी नितांत पाणी गरज लक्षात घेता सध्या कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे पाणी हे पुढे समुद्राला मिळते. त्यामुळे हे पाणी पश्‍चिमेकडे न सोडता पूर्वेकडे कर्नाटक, आंध्र प्रदेश मार्गे तेलंगणाला नेण्याचा घाट घालण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या बदल्यात कोयनेतून निर्माण होणार्‍या विजेएवढी वीज महाराष्ट्राला देण्याच्या दृष्टीने उपाययोजनाही आखण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. 

काही दिवसांपूर्वी याच पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या चार राज्यांतील पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांच्या सभासदांची हैदराबाद येथे एक परिषद आयोजित करण्यात आली होती. दोन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये मॅगसेसे पुरस्कार प्राप्त व जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नदी त्याचे नैसर्गिक प्रवाह त्याला मधल्या काळात घातलेले कृत्रिम बांध, बदललेली व जाणीवपूर्वक वळवलेली नदीपात्रे यासह सध्या काही ठिकाणी मुबलक व धोकादायक पाणी तर काही ठिकाणी पाणीच नाही अशी भयानक परिस्थिती , याशिवाय भविष्यात पाण्याची वाढती गरज व सध्या कमी कमी होत असलेली पाणीपातळी या सर्वच विषयांवर अभ्यासपूर्वक चर्चा झाली. 

एका बाजूला या चर्चा होत असतानाच त्याला जोडूनच महाराष्ट्रातील कोयना धरण या विषयावरही तेथे गंभीर चर्चा झाली. त्यामध्ये नदीचे पाणी हे नदीलाच मिळाले पाहिजे. त्याचे हक्क इतरत्र नको, यामध्ये कोयना धरणातील एकूण पाण्यापैकी पश्‍चिमेकडील जलविद्युत प्रकल्पांसाठी वर्षभरासाठी 67.50 टीएमसी पाणी वापरण्यात येते. तेच पाणी पुढे समुद्राला मिळते त्यामुळे त्याचा शेती अथवा पिण्याच्या पाण्याला काहीच उपयोग होत नाही.नदीचा नैसर्गिक प्रवाहही बदलला जातो. त्यामुळे  पुढील काळात हे पश्‍चिमेकडे सोडण्यात येणारे पाणी हे तिकडे न सोडता नदीच्या मुख्य प्रवाहातून ते कोयना नंतर कृष्णा नदीतच सोडण्यात यावे. त्यामुळे हे पाणी कर्नाटक, आंध्रप्रदेश नंतर तेलंगणा राज्याच्या वाट्याला येईल व यातूनच त्या ठिकाणच्या शंभर किलोमीटर अंतरातील कोरडी नदीची पात्रे ओलिताखाली येवून तिथल्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी  लागून दुष्काळी परिस्थितीवर कायमची मात होईल, असा प्रस्ताव तेथीलच स्थानिक मंत्र्यांनी या परिषदेत मांडला. याशिवाय यामुळे कोयनेतील पाण्यावर होणारी वीजनिर्मिती बंद पडली तरी त्याबदल्यात आम्ही महाराष्ट्राला तेवढी वीज देण्याची तयारीही तेथून दर्शविण्यात आली आहे. 


या परिषदेसाठी महाराष्ट्रातून आम्हाला निमंत्रित करण्यात आले होते. परिषदेत  तेलंगणाचा कोयनेच्या पाणी पळविण्याचा हेतू आमच्या लक्षात येताच तत्काळ आम्ही संबंधित मंत्र्यांना गाठले. कोयना धरणातील एकूण पाणी त्याचे सिंचन व वीजनिर्मिती याचे आरक्षित कोठे हे धरण निर्मिती नंतर कृष्णा कावेरी पाणी वाटप लवादानुसार निश्‍चित करण्यात आले आहेत. तर याच पाणी व वीजनिर्मितीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील विकासाला महत्वपूर्ण हातभार लागला आहे. जर कोयनेची वीजनिर्मिती बंद करून ते पाणी तेलंगणाला देवून भलेही तुमच्याकडून महाराष्ट्राला पर्यायी वीज मिळाली तरी त्याचा पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्यायच होणार आहे. तर 300 किलोमीटर अंतर व वीजगळती आदी तोटे लक्षात घेता जर असे घडलेच तर त्याचा विदर्भ, मराठवाड्यालाच फायदा होईल. त्यामुळे असे प्रयत्न होवून जर पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय झाला तर आम्ही त्याला विरोध करू अशी भूमिका आम्ही तिथे मांडली. 
- नाना खामकर, रोहन भाटे, पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते