Thu, Jun 27, 2019 13:41होमपेज › Satara › आम्ही नादान नाही, हे लक्षात ठेवा

प्रकल्पग्रस्तांचा इशारा आम्ही नादान नाही, हे लक्षात ठेवा

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 24 2018 11:46PMपाटण  :  प्रतिनिधी 

तीन आठवड्याहून अधिक काळ प्रकल्पग्रस्तांनी होळी, गुढीपाडवा यासारखे सण रस्त्यावर साजरे करत पक्षविरहीत आंदोलन केले. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मात्र त्यानंतर राजकीय हेतूने श्रेयवाद घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळेच उसने प्रेम ओळखण्याइतके आम्ही नादान नाही, असा इशारा देत कोयना प्रकल्पग्रस्तांनी राजकीय श्रेदवादाबाबत पत्रकार परिषद घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोयना धरणाच्या निर्मितीपासून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न कायम आहेत. त्यामुळेच 60 वर्षानंतरही तीन - तीन आठवडे आंदोलन करत सणही आंदोलनस्थळीच करावे लागत आहेत. याशिवाय कोयनानगर ते मुंंबई असा ‘लाँग मार्च’ काढण्याची तयारी करावी लागते, हे दुर्दैवी आहे.

‘लाँग मार्च’च्या तयारीमुळेच मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत बैठक घेतली. मात्र काहीजण पहिल्या दिवसापासून आंदोलनास राजकीय रंग देत ते दडपून टाकण्याचा प्रयत्न करत होते. वास्तविक श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षविरहीत आंदोलन उभारण्यात आले होते. न्याय हक्कांसाठी अन्यायाविरूद्ध प्रकल्पग्रस्तांना 60 वर्षांनंतरही आंदोलन करावे लागणे, ही राजकीय व्यक्तींसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.

मात्र, आंदोलन काळात मंत्री येऊनही त्यांना दुसर्‍या मार्गाने नेऊन आंदोलनाकडे पाठ फिरवण्यास लावणारे जनतेची कामे काय करणार? असा दावा करत पाटण तालुक्यात एखाद्या गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी वाट्टेल ते करण्याची परंपरा प्रकल्पग्रस्तांनी अनुभवली आहे. कोयना विभागातील स्थानिक राजकारण्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी काय केले? हे प्रकल्पग्रस्त जनतेच्या समोर येऊन सांगावे, असे आव्हान देत मुख्यमंत्र्यांना मित्र मानणार्‍यांनी आंदोलनापूर्वी बैठक का लावली नाही? असा प्रश्‍नही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला. तसेच एकाच कार्यालयातून एकाच जावक नंबरची दोन वेगवेगळी पत्रे पाठवली जात नाहीत. पण त्यास आपल्याला दिलेले पत्र अपवाद कसे? असा प्रश्‍नही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला.

पत्रामध्ये खाडाखोड आणि जोडाजोड करणार्‍या कार्यकर्त्याला माहित नसावे की, आम्हा प्रकल्पग्रस्तांना  लोकप्रतिनिधीबाबत नितांत आदर होता, असा टोलाही लगावण्यात आला.  एका पक्षाच्या पदाधिकार्‍यांनेही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्तेत असूनही बैठक का झाली नाही. आंदोलन करून लाँग मार्चचा इशारा का द्यावा लागला? असे प्रश्‍न उपस्थित करत आपल्या पाठीमागे कोण आहे ? ते बघण्याचा सल्लाही प्रकल्पग्रस्तांनी संबंधित पदाधिकार्‍यास दिला आहे. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष संजय लाड, दाजी पाटील, महेश शेलार, सचिन कदम सपकाळ, सीताराम माने, डी. डी. कदम यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.