होमपेज › Satara › अहो.. आश्‍चर्यम्’ ढग आले तरी पाटणची वीज जाते..!

अहो.. आश्‍चर्यम्’ ढग आले तरी पाटणची वीज जाते..!

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 8:00PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

आभाळात ढग दाटून आले की मोर आपला पिसारा फुलवून थुईथुई नाचायला लागतो हेच आपण आजवर ऐकत व पहात आलो. तर दुसरीकडे मोठा सुसाट वारा ,वादळी पाऊस, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि तुफान पाऊस झाला की तांत्रिक कारणामुळे वीज जाते हे सर्वज्ञात आहे. मात्र पाटण वीज वितरण कंपनीचा गेल्या काही दिवसातील तांत्रिक कारभार पहाता या सगळ्या नैसर्गिक बाबी घडल्यावर वीज जातेच ती लवकर परत येतच नाही. 

मात्र जरा जरी आभाळ येऊन ढग दाटले की आपोआपच वीज जाते. त्यामुळे वीज कंपनीचे वितरण कमी आणि आणि ग्राहकांसाठी समस्या व अडचणीच जास्त असे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे या  आश्‍चर्याचा वरिष्ठांनीच शोध घेवून ग्राहकांना दिलासा द्यावा अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत. मान्सूनच्या स्वागताची सध्या सर्वत्र जय्यत तयारी चालू असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जनसामान्यांसह सर्वच जण वैतागले आहेत.

पाटणच्या वीज वितरण कंपनीचे सध्या एकूण कामकाज पहाता ज्या गोष्टी पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे व बंधनकारक असतात त्याच गोष्टी वेळेत न झाल्याने त्याचा आता सार्वत्रिक फटका बसू लागला आहे. अगदी किरकोळ पाऊस, वारा झाला तरी झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडतात मग यांना काय केवळ निमित्ताचीच गरज असते त्यामुळे मग किरकोळ बाबी झाल्या की लगेचच वीज गायब. शिवाय येथे कधीही फोन करा फोन करून अथवा फोनची रिंग ऐकून कंटाळाल पण फोन मात्र कधीच उचलला जात नाही ही वस्तुस्थिती. तर मग जर तो उचलायचाच नसेल तर मग ठेवायचाच कशाला ? नाहीतरी या मोबाईलच्या जमान्यात अशा फोनना विचारतच कोण ? परंतु वरिष्ठांच्या प्रशासकीय धुळफेकीसाठी त्याचा निश्‍चितच वापर होत असावा. 

वास्तविक वीज वितरण व्यवस्थेच्या नियमांनुसार पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाकडून पावसाळ्यात निर्माण होणार्‍या अडचणींची उन्हाळ्यातच सोडवणूक करणे बंधनकारक आहे. मात्र येथे बहुतांशी ठिकाणी अद्यापही रस्त्यावर किंवा नागरी वस्त्यातील विजेच्या खांबावरील विद्युततारा या तशाच लोंबकळत पडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे मग किरकोळ वारा, पाऊस झाला की पुन्हा शॉर्ट सर्किटचा धोका आणि वीज गायब त्यामुळे  शिक्षा जनतेलाच.

याशिवाय धोकादायक सडलेले, गंजलेल्या खांबाची व त्याजवळ वास्तव करणार्‍या जनतेची दयनीय अवस्था अद्यापही जैसे थे अवस्थेतच पहायला मिळते. तर संबंधित अधिकार्‍यांना याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे पहायला मिळते. त्यामुळे आता या पाटणच्या वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराकडे वरिष्ठांनीच गांभीर्याने लक्ष घालून याच्या कारभारात उजेड पाडावा अशा संतप्त मागण्या सर्वच स्तरातून केल्या जात आहेत.