Sat, Mar 23, 2019 16:27होमपेज › Satara › ते पक्षासह जनतेचेही होऊ शकत नाहीत

ते पक्षासह जनतेचेही होऊ शकत नाहीत

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 10 2018 12:21AMपाटण: प्रतिनिधी

जो नेता स्वत:च्या पक्षाचा होऊ शकत नाही, तो जनतेचा काय होणार? स्वत:च्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला जिल्हा परिषद निवडणुकीत पाडणार्‍यांना कोण निष्ठावंत म्हणेल, असे प्रश्‍न उपस्थित करत, जो कधीच कोणाचा होऊ शकत नाही, अशा नेत्यांना पुन्हा निवडून देण्याची चूक करू नका, असे आवाहन करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. शंभुराज देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच पाटणसह जिल्ह्याचा राज्याचा आणि देशाचा विकास फक्‍त राष्ट्रवादीच करू शकते, असे सांगत भाजपसह युती शासनाला हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी केले.

पाटण येथील हल्लाबोल आंदोलनावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, महिला आघाडीच्या प्रमुख चित्राताई वाघ, आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील,   आ. नरेंद्र पाटील, आ. दिपक चव्हाण, आ. जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सत्यजितसिंह पाटणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

अजित पवार म्हणाले, या तालुक्याचा लोकप्रतिनिधी नक्की कोणत्या पक्षाचा आहे, हे त्यांचे त्यांनाच माहीत नाही. कधी माझ्या  मांडीला मांडी लावून बसणार, तर कधी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याजवळ जाणार. तर मध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कधी  उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाणार. त्यांना सहकार परिषदेचे अध्यक्ष केले होते, मात्र हेच टनाला चारशे ते पाचशे रुपये कमी दर देतात. त्यामुळे बिनाकामाची व फसवी मंडळी हद्दपार  करत सत्यजितसिंह पाटणकर यांनाच ताकद देण्याचे आवाहनही आ. अजित पवार यांनी केले. 

ना. धनंजय मुंडे यांनी राज्य शासनासह केंद्र सरकारवर सडकून टीका केली. 90 हजार कोटींचा भ्रष्टाचार सोळा मंत्र्यांनी केल्याचा दावा करत शिवसेना आता भिऊसेना झाली आहे. पूर्वी वाघाची शेळी तर आता तिचा ससा झाला आहे. शेतकरी आहे की नाही हे तपासण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गाय घेऊन जाणार आहे. तर लाथ कशी मारायची? हे शिकविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना गाढव भेट देणार असल्याचा उपरोधिक टोलाही ना. मुंडे यांनी लगावला.

विक्रमसिंह पाटणकर यांनी केवळ विध्वंस करण्याचे काम हे देशात, राज्यात व तालुक्यातही चालले आहे. त्यामुळे आता या फसव्या मनोवृत्ती कायमच्या हद्दपार करा, असे आवाहन केले. आ. नरेंद्र पाटील यांनी शंभुराज देसाई यांनी तालुक्याचा नव्हे, तर केवळ स्वतःचाच विकास केला. त्यामुळे यापुढे सत्यजितसिंह पाटणकर हेच आमदार असतील, असे सांगितले. यावेळी जेष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, सभापती राजेश पवार, सभापती उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, राजाभाऊ काळे, तेजस शिंदे, संजय देसाई, सुभाष पवार, शंकर शेडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

 

 

tags : Patan,news, Congress, Movement,  Ajit, Powar, Shambhuraj, Desai, taraget,