होमपेज › Satara › पाटण येथील कृषी अधिकार्‍यास मारहाण

पाटण येथील कृषी अधिकार्‍यास मारहाण

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 11:53PMमारूल हवेली : वार्ताहर

कृषी अधिकारी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत गंभीर नाहीत, असा आरोप करत सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी कदमवाडी (मल्हारपेठ, ता. पाटण) येथे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना जाब विचारला. यावेळी एका अधिकार्‍याने पाटणकर यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक चकमक उडून पाटणकर यांनी संबंधित अधिकार्‍याच्या कानशिलात लगावली.गुरुवारी दुपारी कदमवाडीत पाटण कृषी विभागाकडून शेतकर्‍यांसाठी हुमणी कीड व्यवस्थापन व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता.     

या कार्यक्रमासाठी जिल्हा कृषी अधीक्षक सुनील बोरकर, शास्त्रज्ञ निलेश मालेकर, प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.या कार्यक्रमावेळी विक्रमबाबा पाटणकर हे दोन कार्यकर्त्यांसह तेथे आले. त्यांनी थेट व्यासपीठ गाठत डॉ. मालेकर यांच्या हातातील माईक हिसकावून घेत स्वतः भाषण करण्यास सुरूवात केली. भीषण ओला दुष्काळ चालू असताना अशा शासकीय कार्यक्रमात कसे काय उपस्थित राहता ? अशी विचारणा सर्व उपस्थित शेतकर्‍यांना करत त्यांनी कार्यक्रम बंद करण्याबाबत सांगितले. त्यावर तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू दिले गेले नाही. त्यावेळी शाब्दिक चकमक उडाली आणि अनपेक्षितपणे विक्रमबाबा पाटणकर यांनी आवटे यांच्या कानशिलात लगावली. तसेच शेतकर्‍यांना कार्यक्रमातून उठून जाण्यास सांगितले. तर त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर टायर पेटवून शासकीय कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार प्रविण आवटे यांनी पाटण पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलिस उपनिरीक्षक दिंगबर अतिग्रे तपास करत आहेत. या प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतरही कार्यक्रम होता सुरूच ...

दरम्यान या सर्व धक्कादायक प्रकारानंतर शेतकर्‍यांनी कार्यक्रम सुरू ठेवण्याची विनंती अधिकार्‍यांकडे केली. त्यामुळे कार्यक्रम पुढे सुरूच होता. दरम्यान, कृषी विभागाकडून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.