Sun, Apr 21, 2019 00:19होमपेज › Satara › शिवशाही बसेसमुळे प्रवाशांना भुर्दंड

शिवशाही बसेसमुळे प्रवाशांना भुर्दंड

Published On: Feb 24 2018 1:12AM | Last Updated: Feb 23 2018 11:40PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर शुक्रवारी सकाळपासूनच 5 शिवशाही बसेस उभ्या होत्या. त्यामुळे या बसेस सातारा विभागात दाखल होऊन पुणे मार्गावर धावणार असल्याचे समजते. दरम्यान, सातारा-पुणे मार्गावर या बसेस सोडल्या तर प्रवाशांना भुर्दंड बसणार असून या बसकडे प्रवासी पाठ फिरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गावर अत्याधुनिक अशा शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. या बस वातानुकूलित असून त्यामध्ये आरामदायी आसने आणि एलईडी स्क्रिन बसवण्यात आल्या आहेत.वातानुकूलित बस, आकर्षक डिजिटल बोर्ड, पुशबॅक, आरामदायी सीट, टू बाय टू आसन व्यवस्था, मोबाईल चार्जर,  सीसीटीव्ही, अनाउन्समेन्ट सिस्टिम अशी बसची वैशिष्ट्ये आहेत. या बसची आसनक्षमता 43 आहे.

सातार्‍यात शुक्रवारी सकाळी सातारा बसस्थानक परिसरात  शिवशाहीच्या 5 बसेस दाखल झाल्या आहेत. मात्र, या शिवशाही बसेस सातारा स्वारगेट मार्गावर चालवण्याचा घाट घालण्यात आला आहे. सध्या धावणार्‍या एसटी बसपेक्षा या बसचे तिकीट जादा आहे. त्यामुळे सातारा स्वारगेट मार्गावर या बस चालण्याची शक्यता कमी आहे. तसेच पुण्याकडे विनावाहक बसने जाणारा प्रवासी हा ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे त्याला शिवशाही बसला जादा तिकीट दर देणे परवडणारे नाही. त्यामुळे या बसकडे प्रवासी पाठ फिरवण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच या बसेस उभ्या आहेत. त्यामुळे विभाग नियंत्रक या बसेस नेमक्या कोणत्या मार्गावर सोडणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.