Tue, Apr 23, 2019 13:37होमपेज › Satara › पसरणी घाट देतोय मृत्यूला निमंत्रण

पसरणी घाट देतोय मृत्यूला निमंत्रण

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:23PMभिलार : मुकुंद शिंदे

आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून 33 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेमुळे पाचगणी महाबळेश्‍वर या पर्यटनस्थळाकडे येणार्‍या पसरणी घाट व रस्त्याची दूरवस्था झाल्याने पर्यटक व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पसरणी घाटात गुजरातची बस दरीत कोसळून 33 प्रवासी मृत्यू मुखी पडले होते. या दुख:द घटनेच्या कटुस्मृती जाग्या झाल्या आहेत. 

पसरणी घाटाची दिवसेंदिवस दुरावस्था होत असून लाखो रुपयांचा निधी टाकूनही अनेक ठिकाणी संरक्षकठडे तुटलेले आहेत. दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत. खचलेल्या ठिकाणी दगड, बॅलर ठेवून तात्पुरता उपाय केला आहे. पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने हा रस्ता खड्डेमय झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व देखभाल बांधकाम विभागाकडून होत नाही त्यामुळे वाहन चालवणे अवघड झाले आहे.

अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. याच घाटात सन 2008 साली पर्यटनाला आलेली गुजरातची बस रात्री दरीत कोसळून 33 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण गंभिर जखमी झाले होते. 2004 साली पाचगणीहून एक ट्रक कर्नाटककडे जात असताना दरीत कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी शुटिंगचे साहित्य वाहतूक करणारा ट्रक दरीत कोसळून एक जण ठार झाला होता. अशा प्रकारची मालिका किती दिवस चालू राहणार आणि किती जणांचे बळी घेतल्यानंतर हा घाट दुरुस्ती होणार ? असा संतप्त सवाल  प्रवाशी व नागरिकांतून व्यक्त होत आहे.

पाचगणी-महाबळेश्‍वर रस्त्यावरील बोंडारवाडी गावाजवळच्या वळणावर रस्त्याचा पावसानेे भराव वाहून जावून भगदाड पडले आहेे. या भगदाडाने अपघात होऊ नयेत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर दगड ठेऊन तात्पुरता उपाय केला आहे. त्याठिकाणची परिस्थिती गेली दोन वर्षे जैसे थे आहे. त्यामुळे हा भाग दुरुस्त करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार आहेत. पाचगणी-महाबळेश्‍वर रस्त्यावर अवकाळी ते पाचगणी दरम्यान 2016 साली सलग पाच दिवसात चार अपघात झाले आहेत.