वाई : प्रतिनिधी
पसरणी घाटात धारदार शस्त्राने झालेल्या आनंद ज्ञानेश्वर कांबळे (वय 32) याच्या खुनाचा उलगडा वाई पोलिसांनी अवघ्या 24 तासांत केला असून, पत्नीनेच प्रियकराच्या सहकार्याने पतीचा खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर निखिल सुदाम मळेकर (वय 24, रा. चिखली, पुणे) याला अटक केली आहे. अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. मृत आनंद याची पत्नी दीक्षा हिने खुनाचा कट रचल्याची कबुली दिल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
पुण्याहून महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या एका दाम्पत्यावर शनिवारी दुपारी 3.15 वाजता दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांंनी कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात पतीचा निर्घृणपणे खून करण्यात आला, तर पत्नी गंभीर जखमी झाली होती. या घटनेचे नेमके कारण शनिवारी स्पष्ट झाले नव्हते.
याबाबतचा तपास अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक वेताळ व त्यांचे सहकारी करत होते. लुटमारीचा बनाव करून हल्लेखोरांनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, घटनास्थळावरील पार्श्वभूमी लक्षात घेवून पोलिसांनी ही घातपाताची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवून पोलिसांनी त्या दिशेने तपासाची सुत्रे गतीमान केली होती.
पो. नि. वेताळ यांनी पुण्यातील माहितीगारांच्या आधारे दिक्षा व संशयित आरोपी निखील यांचे अनेक वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळवली होती. त्यानुसार पोलिसांनी आपला मोर्चा पुण्याला वळवला. रविवारी सकाळपासून केलेल्या तपासात आरोपी मळेकर याला निगडी (पुणे) येथे सापळा रचून ताब्यात घेतले. तत्पूर्वी शनिवारी रात्री उशीरापर्यंत दिक्षा हिच्या मोबाईलवरून मळेकर याच्याशी संपर्क साधल्याने दोघांतील प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट झाले होते.
दिक्षाचा विवाह दि. 20 मे रोजी आनंदशी झाला होता. तिचे व निखीलचे प्रेम असल्याने दिक्षा या लग्नापासून नाखूश होती. निखीलने दिक्षाच्या वडिलांकडे लग्नासाठी मागणी घातली होती. परंतु त्यांनी नकार देवून तिचा विवाह आनंदशी करून दिला होता. त्यानंतर दिक्षा व निखील यांनी आनंदच्या खुनाचा कट रचला होता. त्यानुसार निखील व त्याचे साथीदार शुक्रवारीच पाचगणीला मुक्कामी आले होते. पुण्यातून निघाल्यानंतर दिक्षा कांबळे प्रवासाचे लोकेशन सांगत होती. पसरणी घाटात आल्यानंतर तिने नियोजीत कटानुसार उलटी येत असल्याचे कारण सांगून कार घाटात सोळा नंबर येथे थांबवली. त्यानंतर तिने बाहेर उतरून उलटी येत असल्याचे नाटक करत वेळ घालवला.
यावेळी घाटातच दबा धरून बसलेल्या चौघा मारेकरांनी दुचाकीवरून येवून दिक्षा उभी असलेल्या ठिकाणी जावून बेसावध उभा असलेल्या आनंदवर त्यातील दोघांनी धारदार शस्त्राने डोक्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला आनंद काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. यावेळी त्यांच्या सोबत असलेले राजेश भगवान बोबडे व त्याची पत्नी कल्याणी बोबडे हे नवदांपत्य यांनी भीतीपोटी घटनास्थळावरून तातडीने पाचगणी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आनंदला व दिक्षाला पाचगणीवरून आलेल्या एका वाहन चालकाने रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेत असलेल्या आनंदला डॉक्टरांनी तत्काळ प्राथमिक उपचार करून सातारला हलवले होते. रुग्णालयात नेण्यापूर्वीच आनंदचा मृत्यू झाला होता.
पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन येडगे, सहाय्यक फौजदार त्रिंबक अहिरेकर, कृष्णा पवार, जितेंद्र शिंदे, प्रशांत शिंदे, त्रिंबके, ठोंबरे, लोखंडे, सचिन ससाणे, दडस, कांताराम बोर्हाडे, सोमनाथ बल्लाळ, शरद बेबले, रुपेश कारंडे आदींनी तपासात मोलाची कामगिरी केली.
आनंदचा नाहक बळी
आरपीआयचा (आठवले गट) पदाधिकारी असलेला आनंद औंध परिसरात आपल्या मनमिळावू स्वभावाने सर्वांमध्ये सुपरिचीत होता. दोन आठवड्यांपूर्वी त्याचा दीक्षाशी विवाह झाला होता. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्याने मोठ्या थाटात विवाह समारंभ संपन्न केला होता. पत्नी दीक्षाला पाचगणी, महाबळेश्वरला फिरायला घेऊन येणार्या आनंदला नियतीच्या मनात काय आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र, दीक्षाने स्वतःच्या प्रेमापोटी आनंदचा नाहक बळी दिल्याने औंध परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.