Sun, Jul 21, 2019 02:12होमपेज › Satara › पतीच्या खुनानंतरही पत्नीची गाढ झोप

पतीच्या खुनानंतरही पत्नीची गाढ झोप

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 03 2018 11:42PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

डोळ्यांदेखत पतीचा धारदार शस्त्राने खून झाल्यानंतर घटनेबाबत ‘प्रॉपर’ माहिती न देता ‘गुढ’ वागण्याची देहबोली, गंभीर घटना घडली असतानाही पोलिसांना टाळण्यासाठी होणारे प्रयत्न, दुसरीकडे आनंदच्या आईने टाहो फोडला असताना दिक्षाने मात्र थेट सिव्हीलमध्ये बेडवर ताणून दिलेली झोप,  या सर्व अचंबित हालचालीमुळे पोलिस बुचकळ्यात पडले व इथेच तपासाची चक्रे गतीमान झाली आणि ती अलगद सापडली. दरम्यान, प्रियकरामध्ये गुंतलेल्या दिक्षाने कांबळे कुटुंबियांचा अवघ्या दहा दिवसांत ‘आनंद’च हिरावून घेतल्याने ‘प्यार तुने क्या किया?’ असा सवाल उपस्थित झाला आहेे.

आनंद कांबळे (वय 26, रा.औंध, पुणे) यांचा  दहा दिवसांपूर्वी दिक्षा हिच्याशी विवाह झाला होता. सुशिक्षीत व देखण्या पत्नीमुळे नुकताच विवाह झालेला आनंद आयुष्याच्या नव्या इनिंगची मोठी  स्वप्ने पाहत होता. पत्नी दिक्षाही त्याला हसून दाद देत होती. मात्र केवळ तोंडावर हसण्यार्‍या दिक्षाच्या डोक्यात मात्र भलतेच शिजत होते. लग्नाआधीच प्रेमात गुंतलेल्या दिक्षाला लग्नानंतरही प्रियकराचीच ओढ राहिली. दुर्देवाने तिची ही ओढ एवढी राहिली की दहा दिवसांतच आनंदच्या जीवावर उठली.

पसरणी घाटात भरदिवसा नवदाम्पत्यावर चौघांकडून हल्ला झाल्याने सातारा पोलिस हडबडून गेले. वास्तविक महाबळेश्‍वर, पाचगणी ही देशातील टॉपमोस्ट पर्यटनस्थळे. अशा पर्यटनाच्या रस्त्यावर नवदाम्पत्यावर खूनी हल्ला झाल्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची उकल करणे हे आव्हानात्मकच बनले होते. त्यातच चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याचे प्राथमिक चित्र रंगवण्यात आले. यासाठी विवाहितेचे दागिने चोरण्यासाठी हल्लेखोरांनी हल्ला चढवल्याने त्या हल्ल्यात आनंद गंभीर जखमी झाला. मात्र आनंदसोबत गेलेल्या त्याच्या मित्राने गाडीतून पाहिले असता आनंद बचावासाठी डोके धरुन पळत असताना हल्लेखोर मात्र त्वेषाने धावत जावून आनंदवर पाठीमागून वार करत होते.

ही बाब पोलिसांच्या चौकशीत समोर आल्यानंतर चोरीचा उद्देश नसून चोरीचा तो बहाणा असल्याचे निश्‍चित केले. दुसरीकडे आनंदची पत्नी दिक्षा ही प्रत्यक्षदर्शी घटना पाहणारी होती. मात्र डोळ्यांदेखत पतीवर हल्ला झाला असताना पोलिसांना माहिती देताना तिचा चेहरा निर्विकार होता. चेहर्‍यावर अश्रूचे भाव नव्हते. हल्ल्यावेळी दिक्षा किरकोळ  जखमी झाल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालय तथा सिव्हील हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागात उपचार सुरु होते. मात्र दिक्षाला  केवळ खरचटल्याने तिला कोणतेही सलाईन लावले नव्हते. मानसिक धक्का बसला असल्याचे गृहीत धरुन तिला एका  बेडवर शिफ्ट करण्यात आले होते.

यावेळी पोलिस प्राथमिक तपासाचा भाग म्हणून तिला प्रश्‍न विचारत होते. मात्र दिक्षा पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देत नव्हती. पोलिसांनी तिला घटनाक्रम  सांगण्यास सांगितल्यानंतर तिने दोनदा स्वत:ला उलटी होत असल्याने घाटात गाडी थांबवली मात्र उलटी झाली नाही. दुसर्‍यावेळी थांबल्यानंतर असा हल्ला झाला मात्र पुढचे काही आठवत नाही अशी ती उत्तरे देत होती. याशिवाय आनंद नेमका कुठे आहे? तो कसा आहे का? अशी कोणतीही ती माहिती विचारत नव्हती. तिचे हे गूढ वागणे उपस्थितांना कोड्यात टाकणारे होते. पोलिसांनी मात्र तिची हालचाल हेरली व तपासाला सुरुवात केल्यानंतर तिचे  प्रेमप्रकरण समोर आले.

दरम्यान, सातारा पोलिसांनी काढलेल्या प्रेसनोटमध्ये प्राथमिक माहितीनुसार आनंदच्या या खुनात पाचजणांचा समावेश आहे. दिक्षाचे प्रियकर निखील मळेकर याच्यासोबत प्रेम होते व त्याच्या सहाय्यानेच आनंदचा खून केला असल्याचीही तिने पोलिसांसमोर कबुली दिली आहे. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर अवघ्या बारा तासात वाई पोलिसांनी या खुनाचे गूढ उलगडले. या खुनाची उकल करत असताना दिक्षाचे संशयास्पद वागणे हेच पोलिस तपासाचे यश आहे.

आनंदचा खून झाल्यानंतर कांबळे कुटुंबिय सहा वाजता जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात आले होते. दिक्षाला आपत्कालीन विभागात उपचारासाठी दाखल केल्याने कांबळे कुटुंबियही याच विभागासमोर येवून थांबले. आनंदचा मृत्यू झाल्याचे कांबळे कुटुंबियांना सांगितल्यानंतर  आनंदच्या आईने फोडलेला टाहोने सिव्हीलच्या भिंतीही चर्र करत होत्या. अवघ्या 26 वर्षाचा व नुकताच विवाह झालेला मुलगा जगात नसल्याचा विरह यामुळे आनंदची आई दोनवेळा बेशुध्दही पडली. कांबळे कुटुंबियांनी केलेल्या या आक्रोशामुळे सिव्हील रुग्णालयाचा परिसरही गलबलून गेला. दरम्यान, कांबळे कुटुंबिय हा आक्रोश सुरु असताना मात्र समोरच्याच बेडवर दिक्षाने झोपेचे सोंग घेतले होते.