Wed, May 27, 2020 09:28होमपेज › Satara › पसरणी घाटात प्रवाशांच्या जीवाला घोर

पसरणी घाटात प्रवाशांच्या जीवाला घोर

Published On: Apr 22 2018 1:14AM | Last Updated: Apr 21 2018 10:03PMभिलार : मुकूंद शिंदे

वाईकडून पाचणीकडे जाताना लागणार्‍या पसरणी घाटात शुक्रवारी विचित्र अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी जरी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले. ब्रेक फेल झाल्याने घाटातील तीव्र उतारामुळे ट्रक दोन कारवर आदळला. या घटनेमुळे पसरणी घाटात प्रवासी किती सुरक्षित आहेत हे अधोरेखित होते. त्यामुळे या घाटाची दुरूस्ती होणे गरजेचे झाले आहे. हे काम सध्या धीम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला घोर लागून राहिला आहे. 

वाईहून पाचगणी-महाबळेश्‍वर या थंड हवेच्या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात. या गिरीशिखरावर येण्यासाठी सुमारे 10 किलोमीटरचा प्रवास पसरणी घाटातून करावा लागतो. घाटातून रात्रंदिवस खाजगी प्रवासी वाहने,मालवाहतूक करणारे ट्रक तसेच लहान मोठी शेकडो वाहने सतत मार्गक्रमण करतात. सध्या या घाटात डांबरीकरणाचे काम चालू आहे. काहीअंशी रस्ता रुंदीकरणाचे काम झाले असले तरी या घाटाच्या दुरुस्तीचे काम धीम्या गतीने चालू आहे. पण या पसरणी घाटाची दिवसेंदिवस दुरावस्था होत असून लाखो रुपयांचा निधी टाकूनही अनेक ठिकाणी संरकक्ष कठडे तुटलेले आहेत.

याबाबत काहीच दिवसांपूर्वी दै.‘पुढारी’ने आवाज उठवला होता. पसरणी घाटाची वाट बिकट असे वृत्त प्रसिध्द केले होते. मात्र, कुंभकर्णागत झोपलेल्या बांधकाम विभागाला जाग आली नाही. त्यानंतर अवघ्या 7 दिवसातच हा अपघात झाला. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. 

अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत. खचलेल्या ठिकाणी दगड, पिंपे ठेवून तात्पुरता उपाय केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुरुस्ती व देखभाल बांधकाम विभागाकडून होत नसल्याने वाहन चालवणे अवघड होत आहे. अनेक जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. सध्या पर्यटन हंगाम चालू आहे हजारोंच्या संख्येने पर्यटक पाचगणी- महाबळेश्‍वर या स्थळांना भेटी देत आहेत पण घाटाच्या दुरावस्थेने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे 

पावसाळ्यात ही या ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार नेहमीच घडतात. त्यामुळे वाहतूक कोंडी हा पावसाळ्यातील नेहमीचाच प्रश्‍न बनला आहे. त्यासाठी उपाय म्हणून अशा संभाव्य जागांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करून संरक्षक जाळ्या बसवण्याची आवश्यकता असल्याची मागणी पर्यटक व प्रवासी करीत आहेत.

 

Tags : satara, wai, Pasarni ghat, Danger,