Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Satara › दिल्ली येथील राष्ट्रीय परिषदेत कृष्णाच्या शेतकर्‍यांचा सहभाग

दिल्ली येथील राष्ट्रीय परिषदेत कृष्णाच्या शेतकर्‍यांचा सहभाग

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 8:45PMरेठरे बुद्रुक : प्रतिनिधी

भारतात 2015 पासून जागतिक जैवइंधन दिवस साजरा केला जातो. यंदाही दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच जैवइंधन दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेत य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे 8 ऊस उत्पादक शेतकरी व 2 अधिकारी अशा एकूण 10 जणांनी सहभाग घेतला. 

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खाद्यमंत्री रामविलास पासवान, कृषीमंत्री राधामोहन सिंह, विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतात दरवर्षी 120 ते 160 दशलक्ष मेट्रिक टन पिकांचे अवशेष व जैविक कचरा उपलब्ध होत असतो. त्यापासून सुमारे 2500 ते 3000 कोटी लिटर इथेनॉल तयार करता येऊ शकते. यामुळे जैविक कचर्‍याची समस्या तसेच जागतिक तापमानावर होणारा परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे. आपल्या देशाची इथेनॉलची गरज भागविण्यासाठी औद्योगिक व शहरातील कचर्‍याचे जैवइंधनात परिवर्तन करणे गरजेचे असून, शेतकर्‍यांनीही पिकाच्या अवशेषापासून जैवइंधन तयार करण्याचा प्रयत्न करावा.

राष्ट्रीय परिषदेसाठी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 10 जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये कारखान्याचे ऊसउत्पादक शेतकरी जयवंत थोरात (कार्वे), विकास साळुंखे (काले), सर्जेराव जाधव (रेठरे बुद्रुक), संजय निकम (शेरे), महादेव गरूड (येणके), अर्जुन कापूरकर (रेठरे बुद्रुक), नामदेव कदम (पेठ), शिवाजी पाटील (तांबवे) यांच्यासह ऊसविकास अधिकारी पंकज पाटील व सहायक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर या समन्वयकांचा समावेश होता.