Mon, Jun 17, 2019 02:58होमपेज › Satara › चुलत्या-पुतण्यामुळे आठ कुटुंबे वाचली

चुलत्या-पुतण्यामुळे आठ कुटुंबे वाचली

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 02 2018 9:33PMपरळी : वार्ताहर

मुंबईची लोकसंख्या वेगाने वाढत असताना  कुटूंबासह वास्तव्य करण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. या समस्येमुळे विविध आपत्तीजनक घटना घडत असतात. या घटनांमध्ये मदत करण्यास नेहमीच सातारकर अग्रेसर राहिलेले आहेत. परळी खोर्‍यातील पांगारे  गावचे सुपूत्र किरण जाधव त्यांचे पुतणे सचिन जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी ठाण्यात कोसळत असलेल्या इमारतीतून 8 कुटूंबांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या या प्रयत्नाने अनेक जणांचे प्राण वाचले असून होणारा मोठा अनर्थ टळला. ठाणे येथे वास्तव्यास असणारे व मूळचे परळी खोर्‍यातील पांगारे गावचे किरण जाधव रहिवासी आहेत.

ठाणे येथील एनकेटी कॉलेज परिसरात ‘न्यू कॅप्टन’ नावाची चार मजली इमारत आहे. तिचे बांधकाम खूप वर्षापूर्वीचे असल्याने इमारतीचा काही भाग दुपारच्या वेळेत कोसळण्यास सुरुवात झाली. या इमारतीत 8 कुटूंबे वास्तव्यास होती. इमारत दुर्घटनेवेळी किरण जाधव हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या इमारत परिसरात आले होते. त्यावेळी त्यांना या घटनेची माहिती समजली. त्यांनी कोणताही विचार न करता त्यांचे पुतणे सचिन जाधव व सहकारी सचिन जाधव, नितीन लांडगे यांच्या मदतीने इमारतीत अडकलेल्या कुटूंबियांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या दुर्घटनेत सहा महिन्यांच्या चिमुरडीसह तिची आई गंभीर जखमी झाली आहे. किरण जाधव हे युवासेनेचे कार्यकर्ते आहेत. समर्थ सातारा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, आपुलकी फौंडेशनच्या माध्यमातून प्रभावी काम करत आहेत. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरावर कोैतुक होत आहे. त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल पांगारे ग्रामस्थ व तरुण मंडळाच्या वतीने केदारनाथ यात्रेत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

संकटाच्या काळात मदतीला धावून जाणे हा साता-याच्या मातीचा गुण आहे. दुर्घटनेदरम्यान महिला, वयोवृद्ध आणि सहा महिन्याच्या चिमुरडीला संकटातून बाहेर काढू शकलो त्याचे समाधान वाटते.
-किरण जाधव, पांगारे, ता. सातारा