Sun, May 19, 2019 14:07
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › मुलांना खरी जीवनमूल्ये शिकवण्याची गरज

मुलांना खरी जीवनमूल्ये शिकवण्याची गरज

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खटाव : अजय अं. कदम 

खटाव तालुक्यातील नेर येथील क्रांती शिर्के या दुसरीत शिकणार्‍या आठ वर्षाच्या चिमुरडीचा त्याच गावातील अल्पवयीन नराधमाने लैंगिक अत्याचार करुन खून केल्याची मन सुन्न करुन टाकणारी घटना शनिवारी उघडकीस आली. समाजातील वासनांधतेची शिकार ठरलेल्या क्रांतीच्या मृत्यूने शिर्के कुटुंबासह संपूर्ण नेर गाव शोकसागरात बुडाले. ग्रामीण भागात अशा घटनांमध्ये होणारी वाढ निश्‍चितच भयावह आहे. दरम्यान अशा घटना घडू नयेत यासाठी पालकांनी आपल्या मुलांना जगण्याची  खरी मूल्ये शिकवण्याची वेळ आली आहे.

इयत्ता दुसरीत शिकणारी क्रांती घराबाहेर बागडत होती. तीच्या बालबोध विश्‍वात ती रमली होती. हातात कुंकू घेऊन तीचा खेळ सुरु होता. तीला तिच्यावर येणार्‍या संकटाची पुसटशीही कल्पनाही नव्हती. समाजातील एक  वासनांध नजर तिचा काळ बनून आली आणि क्षणार्धात सगळे होत्याचे नव्हते झाले. पोलिसांच्या सांगण्यानुसार  तिच्याच नात्यातील  एका नराधमाने तिला घरासमोरुन पळवून नेऊन अत्याचार केला. तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने  मृतदेह गावाशेजारील एका विहिरीत फेकून दिला. मृतदेह विहिरीत टाकण्यासाठी त्या नराधमाला त्याच्याच आईने मदत केली. पुरोगामी समाजाला काळिमा फासणार्‍या ग्रामीण भागात घडलेल्या या घटनेने  सध्याचा समाज कोणत्या दिशेने चालला आहे ते दिसून येते. 

शहरांमधे चिमुरड्यांचे पालक नोकरी व्यवसायात व्यस्त असतात. लहान मुले, मुलींच्या शिक्षण आणि इतर कलागुणांकडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही.  मुलामुलींची जबाबदारी त्यांना मन मारुन इतरत्र द्यावी लागते आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत समाजातील वासनांध वृत्ती कुटील डाव साधतात. शहरी भागात अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत. ग्रामीण भागात अशा घटना तुरळकच  घडायच्या मात्र, आता परिस्थिती बदलत असल्याचे अशा घटनांवरुन दिसत आहे. 

कोपर्डीच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. आता खटावसारख्या ग्रामीण तालुक्यात अशा घटनांची वारंवारता वाढायला लागली आहे. अशा घटनांमधे दोष नक्की कुणाचा? पालकांचा कि चिमुकल्यांचा? पुरोगामीत्वाचा  बुरखा पांघरलेल्या समाजाचा कि आजच्या आधुनिक जीवनशैलीचा ?  आता समाजमन बदलण्याची वेळ आली आहे. पालकांनी आपल्या मुलांना जगण्याची  खरी मूल्ये शिकवण्याची वेळ आली आहे. समाजातील वासनांधता रोखण्यासाठी पावले उचलण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनीच सावधानता बाळगली तर अशा घटनांना पायबंद घालणे शक्य होणार आहे.

पोर्न व्हिडिओचे वेड ठरतेय घातक ........

मोबाईल इंटरनेटचा विळखा आता ग्रामीण भागालाही पडला आहे. प्रत्येक घरात स्मार्टफोन आल्याने मोबाईलवेड्यांची संख्या वाढत आहे. किशोरवयात मोबाईलवर पोर्नफिल्म पहाण्याचे फॅड चांगलेच वाढले आहे. त्यातूनच वासनांधपणा वाढल्याने नेरमधील घटना घडल्याचे समोर आले आहे. पोर्न व्हिडिओचे हे वेड घातक ठरत आहे.


  •