सातारा : मीना शिंदे
दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्याने विद्यार्थी अभ्यासात गर्क आहेत. अभ्यास व आरोग्य सांभाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्याबरोबर वेळेचे नियोजन करताना पालकांची कसरत सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
फेब्रुवार व मार्च महिना म्हणजे परीक्षांचा हंगाम असतो. दि. 21 रोजी बारावी आणि 1 मार्चपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरु होत आहेत. दहावी आणि बारावी ही वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पाईंट असल्याने अभ्यासाचे नियोजन फार महत्वाचे आहे. त्यामुळेविद्यार्थी दक्ष असतातच मात्र पालक त्यांच्यापेक्षा जास्त दक्ष राहत असल्याने त्यांचा परिपूर्ण अभ्यास व चांगले आरोग्य यावर सुज्ञ पालक भर देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा म्हणजे मोठी लढाईच वाटते. ही लढाई चांगल्या मार्कस्नी जिंकणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असते. ते पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी विद्यार्थी करत असतात. अशा परिस्थितीत परीक्षा कालावधीत त्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पालकवर्गाचा विशेषत: माता पालकांची धडपड सुरु असते. आपल्या पाल्याला जास्तीत जास्त चांगले गुण मिळावेत, यासाठी आवश्यक ते शैक्षणिक साहित्य जेवढ्या तत्परतेने उपलब्ध करतात तेवढ्याच तत्परतेने आरोग्यही सांभाळले जात आहे.
अभ्यासात व्यत्यय नको, परीक्षेच्या तोंडावर किंवा परीक्षा काळात आजारी पडायला नको यासाठी योग्य नियोजन पालकवर्ग करत आहे. मात्र, त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या वेळा सांभाळणे, त्यांचा आहार आणि विश्रांतीचे वेळापत्रक सांभाळताना पालकांची तारांबळ उडत आहे. सर्रास विद्यार्थी रात्री जागरण व पहाटे लवकर उठून अभ्यास करतात. यावेळी त्यांना झोप येवू नये तसेच अभ्यासाचा कंटाळा येवू नये यासाठी रात्री बारा वाजताही पालक त्यांना चहा, कॉफी करुन देत असतात. त्यामुळे त्यांचे जागरण होते. तसेच सकाळी पहाटे मुलांना उठल्यावर फ्रेश राहण्यासाठी दूध किंवा कॉफी नंतर हेल्दी नाष्टा अशी सर्व तयारी पालक वर्ग करत असल्याने पालकांवरही परीक्षेचा ताण येत आहे.
असे सांभाळा आरोग्य
परीक्ष काळात सर्रास मुलं रात्री उशीरा झोपतात व पहाटे लवकर उठतात. जागरण करताना जास्त चहा घेतल्यामुळे आरोग्यास हानीकरण ठरु शकते. त्यामुळे त्यासोबत काहीतरी खायला द्यावे तसेच दोन वेळचे सकस व संतुलित जेवण, दिवसातून एक तरी फळ किंवा फळांचा ज्यूस, सरबत द्यावे. परीक्षा काळात जंक फूड टाळावे.