Fri, Sep 21, 2018 13:57



होमपेज › Satara › आयलँडसाठी जागेचे पंचनामे

आयलँडसाठी जागेचे पंचनामे

Published On: Dec 30 2017 12:36AM | Last Updated: Dec 29 2017 10:25PM

बुकमार्क करा




कोरेगाव : प्रतिनिधी 

रहिमतपूर शहरातील गांधी चौकातील ट्राफिक आयलँडची जागा ताब्यात घेण्यास शुक्रवारी प्रशासनाने सुरुवात केली. त्यानुसार जागेचे पंचनामेही करण्यात आले. मात्र, व्यावसायिकांच्या विनंतीवरून प्रशासनाने जागा खाली करण्यासाठी आठवड्याची मुदत दिली. दरम्यान, या मुदतीत व्यावसायिकांनी आपल्या जागा खाली न केल्यास दि. 5 जानेवारीला संबंधित मिळकती जेसीबीच्या सहाय्याने  खाली करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार स्मिता पवार यांनी दिला.

रहिमतपूरमधील गांधी चौकात  ट्राफिक आयलँड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने दि. 20 डिसेंबर 2017 रोजी भूसंपादनाबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. संबंधित व्यावसायिकांना दि. 29 डिसेंबरपर्यंत जागा खाली करण्यासही सांगण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदार स्मिता पवार यांनी शुक्रवारी संबंधित व्यावसायिकांना 24 तासात जागा खाली करण्याच्या सूचना केल्या. याचदरम्यान प्रशासकीय यंत्रणेमार्फत पोलिस बंदोबस्तात संबंधित जागांचे पंचनामे सुरू करण्यात आले. यावेळी व्यावसायिकांनी तहसीलदारांसमोर पर्यायी व्यवस्था करण्याची एक महिन्याची मुदत मागितली. मात्र, तहसीलदारांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वाढीव मुदतीस नकार देऊन जागा तत्काळ खाली करण्याच्या सक्त सूचना दिल्या.

दरम्यान, नगराध्यक्ष आनंदा कोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, पालिकेच्या पदाधिकारी व व्यावसायिकांनी विनंती केली. त्यानुसार तहसिलदार स्मिता पवार यांनी व्यावसायिकांकडून स्वत:हून जागा खाली करण्याबाबत लेखी हमी घेतल्यानंतरच मानवतेच्या दृष्टीकोनातून आठवड्याची मुदत दिली. 

कारवाईदरम्यान सर्व मिळकत धारकांचे पंचनामे करण्यात आले. यावेळी सातारा नगररचनाकार मिलींद आवडे, सहाय्यक नगररचनाकार दिलीप कुलकर्णी, हणमंत मोरे, आनंद कांबळे, अतुल गावंडे, पालिकेचे मुख्याधिकारी श्याम गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानुगडे, रहिमतपूर नगरभूमापनचे भूमापक गणेश कुंभार, पोलीस पाटील दिपक नाईक, नगरसेवक, तलाठी सदावर्ते उपस्थित होते.