Thu, Nov 15, 2018 01:47



होमपेज › Satara › पसरणी घाटही बळींना चटावलाय

पसरणी घाटही बळींना चटावलाय

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 10:12PM



भिलार : मुकूंद शिंदे

दोन दिवसांपूर्वी खंबाटकी घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा व त्याअनुषंगाने रस्त्यांच्या दूरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. पाचगणी व महाबळेश्‍वर या जगप्रसिध्द पर्यनटस्थळी जाण्यासाठी असलेला पसरणी घाटही असाच बळींना चटावलेला आहे. दरवर्षी भीषण अपघातांची मालिका सुरू असतानाही या घाटाच्या दुरुस्तीचे व मजबुतीकरणाचे नाव घेतले जात नाही. त्यामुळे येथील उपाययोजनांसाठी आणखी किती बळी हवे आहेत? असा उद्विग्‍न सवाल जनमाणसातून केला जात आहे.

पाचगणी  महाबळेश्‍वर हे जागतिक दर्जाचे व पर्यटनस्थळ असून या ठिकाणी उन्हाळी,पावसाळी आणि हिवाळी हंगामात मुंबई, पुणे तसेच गुजरात सह परदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात.या पर्यटनस्थळाकडे येताना पसरणी घाट लागतो या घाटातून रात्रंदिवस खाजगी प्रवासी वाहने, मालवाहतूक करणारे ट्रक तसेच लहान मोठी शेकडो वाहने सतत मार्गक्रमण करतात. या मार्गाचे काही अंशी रुंदीकरण करण्यात आले आहे. पण या घाटाची दिवसेंदिवस दुरावस्था होत असून लाखो रुपयांचा निधी टाकूनही अनेक ठिकाणी तुटलेले संरक्षक कठडे, खचलेल्या साईडपट्ट्या, अनेक ठिकाणचे खड्डे, खचलेल्या ठिकाणी दगड व पिंपे ठेवून केलेल्या उपाययोजना दृष्टीस पडतात. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे या रस्त्याची दुरुस्ती व देखभाल होत नाही. त्यामुळे वाहन चालवणे अवघड होत आहे. यामध्ये अनेक जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

याचबरोबर पाचगणी- महाबळेश्‍वर रस्त्यावर  बोंडारवाडी गावाजवळच्या वळणावर रस्त्याला पावसामुळे  भराव वाहून गेल्याने एक भगदाड पडले होते. या भगदाडाने अपघात होऊ नयेत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने ं रस्त्यावर दगडे ठेऊन तात्पुरता उपाय केला होता. त्यानंतर आता दुसरा पावसाळा आला तरी परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. त्यामुळे हे भगदाड मुजवण्यासाठी आणखी किती दिवस लागणार? असा प्रश्‍न स्थानिक व प्रवासी उपस्थित करत आहेत. याच रस्त्यावर अवकाळी ते पाचगणी या गावाच्या दरम्यान 2016 साली सलग पाच दिवसात चार अपघात झाले होते. या अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक प्रवाशी जखमी झाले होते सध्या पर्यटन हंगाम चालू असून हजारोंच्या संख्येने पर्यटक पाचगणी- महाबळेश्‍वर या स्थळांना भेटी देत आहेत पण घाटाच्या दुरावस्थेने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी खंबाटकी घाटात जे काही मृत्यू तांडवर झाले त्यानंतर तरी बांधकाम विभागाला जाग येईल काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पसरणी घाटाची दुरुस्ती कधी होणार?

पसरणी घाटात 2008  साली गुजरातच्या भाविकांची बस दरीत कोसळून 32 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. 2004 साली पाचगणीहून एक ट्रक कर्नाटकाकडे जात असताना दरीत कोसळून चौघांचा मृत्यू झाला होता. नुकताच काही दिवसांपूर्वी शूटिंग चे साहित्य वाहतूक करणारा ट्रक दरीत कोसळून एकजण ठार झाला होता. अशा प्रकारची मालिका किती दिवस चालू राहणार आणि किती जणांचे बळी घेतल्यानंतर हा घाट  दुरुस्ती होणार ? अशा संतप्त भावना प्रवाशी व नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.