होमपेज › Satara › पीआरसीकडून जि.प. अधिकार्‍यांची झाडाझडती

पीआरसीकडून जि.प. अधिकार्‍यांची झाडाझडती

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 11:42PMसातारा : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या महाराष्ट्र विधान मंडळाच्या पंचायतराज समितीने (पीआरसी) पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. गुरुवारी ही समिती जिल्ह्यातील पंचायत समितींना भेटी देणार असल्याने या विभागांना धास्ती लागून राहिली आहे.  

पीआरसी बुधवारी सातार्‍यात दाखल झाली असून, शासकीय विश्रामगृहावर समितीचे प्रमुख सुधीर पारवे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी  जिल्ह्यातील आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण यांच्याबरोबर अनौपचारिक चर्चा केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून समितीच्या सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली.

पीआरसीच्या टीमने 2012 व 13 च्या लेखा पुनर्विलोकन अहवालातील सातारा जिल्हा परिषदेच्या  संबंधातील  145 परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्यासह विविध विभागाच्या खातेप्रमुखांची साक्ष घेण्यास सुरुवात केली. आ. सुधीर पारवे, आ. चरण वाघमारे, आ. डॉ. देवराव होळी, आ. वीरेंद्र जगताप, आ. राहुल मोटे, आ. विक्रम काळे, आ. बाबुराव पाचर्णे, आ. रणधीर सावरकर, आ. आर. टी.देशमुख, आ. डॉ. सुरेश खाडे, आ. भारत भालके, आ. दिलीप सोपल, आ. दीपक चव्हाण, आ. दत्तात्रय सांवत यांच्यासह मंत्रालयातील अधिकार्‍यांनी ही साक्ष घेतली.

समितीने प्राथमिक शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, बांधकाम उत्तर व दक्षिण, लघु पाटबंधारे, एकात्मिक  बाल विकास, समाजकल्याण,  कृषी, ग्रामीण पाणी पुरवठासह अन्य विभागाची समितीने परिच्छेदानुसार साक्ष घेताना त्रुटींवर संंबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. 2012 व 13 मध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असलेले  अधिकारीही सकाळपासूनच  उपस्थित होते. त्यामुळे त्यातील काही अधिकार्‍यांना पंचायत राज समितीसमोर जावे लागले. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबतची प्रक्रिया सुरू होती.

गुरूवारी ही समिती  3 ते 4  आमदार व अधिकार्‍यांची सर्वसमावेशक 4 पथकांची स्थापना करून जिल्ह्यातील 11 तालुक्यातील पंचायत  समितींची पाहणी करणार आहे. ही पथके सरासरी 3 पंचायत समिती पाहणी करणार असल्याचे समजते. सकाळी 9 वाजल्यापासून  जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जि.प. प्राथमिक शाळा व ग्रामपंचायती व अंगणवाड्यांना भेटी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांची साक्ष  समिती घेणार आहे. शुक्रवार दि. 13 रोजी सकाळी 10 पासून जिल्हा परिषदेच्या सभागृहात 2013 व 14 या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष घेण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेकडून वर्गणी कशासाठी?

पंचायतराज समितीची उठाठेव करण्यासाठी जिल्हा प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेपासून अगदी ग्रामीण भागातील अंगणवाडीपर्यंत पीआरसीच्या पार्श्‍वभूमीवर लगीनघाई सुरू आहे. ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कर्मचार्‍यांकडून वर्गणी काढण्यात आली आहे. या वर्गणीची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषदेकडून विद्यार्थी वेठीस

पंचायतराज समिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्यांना भेटी देणार आहे. बहुतांश माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा झाल्या आहेत. तरीही विद्यार्थ्यांना सकाळी 7 वाजताच शाळेत बोलावले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याने पालकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.