होमपेज › Satara › सीईओंची दोन तास साक्ष अन् २२५ प्रश्‍नांचा भडिमार

सीईओंची दोन तास साक्ष अन् २२५ प्रश्‍नांचा भडिमार

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:35PMसातारा : प्रतिनिधी

पंचायत राज समितीने शुक्रवारी  जिल्हा परिषदेच्या सन 2013 व 14 च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची सुमारे 2 तास साक्ष घेतली. यावेळी समितीच्या सदस्यांनी विविध विभागातील तब्बल 225 प्रश्‍नांचा भडिमार केला.  त्यावर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या प्रश्‍नांची अचूक उत्तरे दिली. दरम्यान, शुक्रवारी समितीमधील 22 आमदारांनी उपस्थिती लावली होती.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी  महाराज सभागृहात पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सदस्यांनी सन 2013 व 14 च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची वित्त विभागातील  जि.प. स्वउत्पन्न, अंदाजपत्रक, वित्त विषयक इतर बाबी, तेराव्या व चौदाव्या वित्त आयोगातील तिन्ही स्तरावर प्राप्त निधीचा तपशील घेण्यात आला. शिक्षण विभागातील प्राथमिक शाळा, बालवाड्या, मुलींची शाळेतील उपस्थिती, विद्यार्थी गळती, विद्यार्थ्यांना गणवेश व लेखन सामुग्री देण्याची योजना, शिक्षण, शालेय पोषण आहार कार्यक्रम, प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी मिळणार्‍या अनुदानाचा विनियोग, पटपडताळणी कार्यक्रमाची माहिती घेण्यात आली.

आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व शवविच्छेदन केंद्रे, आरोग्य केंद्रातील  वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम व दुरूस्ती. जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती व अंमलबजावणी, शालेय आरोग्य कार्यक्रमाबाबत डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून माहिती घेतली.कृषि व पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन योजना,लघुपाटबंधारे कामे, पाणी पट्टी, जवाहर विहीर, धडक सिंचन विहिरी, ग्रामीण नळपाणीपुरवठा योजना, विंधन विहिरी व त्यावर बसवण्यात आलेले हातपंप, विद्युतपंप, पिण्याच्या पाण्याची टंचाईबाबत माहिती घेतली.

बांधकाम विभागाकडून  अधिकारी व कर्मचारी इमारती, रस्ते बांधकाम, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्यामार्फत करण्यात येणार्‍या बांधकामाचा व विकासकामाचा दर्जा तपासणी, लाँचेस, तीर्थक्षेत्र विकास योजनेवर माहिती घेतली. समाजकल्याण विभागाने  जिल्हा परिषदांनी  स्वउत्पन्नातून मागासवर्गीयांच्या  कल्याणासाठी  20 टक्के रकमेची केलेली तरतुद,  अनु. जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजना, वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजना, वन अनुदान योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील इंदिरा आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजनेचा आढावा घेतला.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना, महिला व बालकल्याण, एकात्मिक बालविकास सेवा योजना, ग्रामपंचायत विभागाच्या ग्रामसचिवालय योजना, केंद्र पुरस्कृत ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, जिल्हा परिषद  मालमत्तेची सविस्तर माहितीसह समितीच्या सदस्यांनी डॉ. कैलास शिंदे यांची सुमारे 2 तास साक्ष घेतली. विविध विभागाच्या प्रश्‍नांना सिईओंनी अचुक उत्तरे दिली.