Mon, Jun 24, 2019 17:17होमपेज › Satara › पीआरसीच्या आगमनामुळे जिल्हा परिषद अलर्ट 

पीआरसीच्या आगमनामुळे जिल्हा परिषद अलर्ट 

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 11:09PMसातारा : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायत राज समितीचे  बुधवारी सातार्‍यात आगमन झाल्यानंतर अवघी जिल्हा परिषद अलर्ट झाली. कर्मचारी व अधिकार्‍यांनी कधी नव्हे ती ओळखपत्रे खिशाला लावली होती. उत्साही वातावरणात पीआरसीचे स्वागत करण्यात आले.  जिल्हा परिषदेत सर्वत्र  विविध रंगी  आकर्षक रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते.उत्साही वातावरणामुळे झेडपीचा लुक एकदम बदलून गेला आहे.

पंचायत राज समिती दि.11 ते 13 एप्रिल अखेर सातारा जिल्हा दौर्‍यावर आहे. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पंचायत राज समितीचे प्रमुख आ. सुधीर  पारवे व समितीतील आमदारांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील आमदार व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांच्याशी अनौपचारिक चर्चा केल्यानंतर समितीचा ताफा जिल्हा परिषद कार्यालयात दाखल झाला. छत्रपती शिवाजी सभागृहात पुन्हा जिल्हा प्रशासनाच्यावतीने अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,  शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील यांच्या हस्ते समितीमधील आमदारांचे बुके, पुस्तक व मानचिन्ह देवून स्वागत करण्यात आले.

सातारा दौर्‍यावर पंचायत राज समिती येणार्‍या असल्याने गेल्या महिनाभरापासून जय्यत तयारी सुरू होती. जिल्हा परिषद कार्यालयाला रंगरंगोटी करण्यात आल्याने जिल्हा परिषदेला कार्पोरेट लूक आला  आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पोर्चमध्ये विविध रंगी रांगोळीचा गालिचा रेखाटण्यात आला आहे.  या आकर्षक रांगोळी रेखाटल्याने प्रत्येक दालनांची शोभा  वाढली आहे. ठिकठिकाणी शोभेच्या झाडांच्या कुंड्या ठेवल्यामुळे  निसर्गाच्या सहवासात फिरत असल्याचा भास होत आहे. सर्वत्र  रूम फ्रेशनर मारल्याने   परिसरात सुगंध दरवळला होता.

सर्वत्र कापडाच्या पायघड्या घालण्यात आल्या असून स्वच्छतागृहेही चकाचक करण्यात आली आहेत. स्वच्छतागृहात हॅन्डवॉश व पेपर नॅपकीनची सोय करण्यात आली आहे. तिसर्‍या मजल्यावर आलेल्या पदाधिकार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुसज्ज असे आरोग्य पथक तैनात करण्यात आले  असून  पंचायत राज समितीमुळे जिल्हा परिषद परिसरासह विविध विभागांना नव्याने झळाळी प्राप्त झाली आहे. त्यामुळे  दररोज जिल्हा परिषदेमध्ये अशी व्यवस्था केली तर   प्रसन्न वातावरण निर्माण होईल. नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सुटण्यास मदत होणार आहे.

 

Tags : satara, satara news, Panchayat Raj Committee, satara zp