Sun, Aug 18, 2019 14:22होमपेज › Satara › तुकोबांनी ठेविले प्रस्थान आता पंढरीचे ध्यान...!

तुकोबांनी ठेविले प्रस्थान आता पंढरीचे ध्यान...!

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 05 2018 11:15PMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

परमार्थिक आनंदाने भारलेला वैष्णवांचा कल्लोळ, तुतारीची दुंदुभी, वीणेचा झंकार आणि टाळ-मृदुंगाचा ठेका जणू आभाळाला साद घालत होता. वैष्णवांचा कल्लोळ ऐकून वरुणराजाही जलाभिषेक करीत होता. पावसाने आणि भक्‍तिरसात चिंब झालेल्या वारकर्‍यांनी गुरुवारी (दि. 5) देहूतील विठ्ठल मंदिराच्या देऊळवाड्यात तुकोबारायांच्या पालखीचा 333 वा प्रस्थान सोहळा ‘याचि देही याची डोळा’ अनुभवला.

वैष्णवां संगती सुख वाटे जिवा । आणिक मी देवा काही नेणें ॥
गाये नाचे उडें आपुलिया छंदा । मनाच्या आनंदे आवडीने ॥

श्री संत तुुकाराम महाराजांच्या या अभंगातील वर्णनाप्रमाणे गुरुवारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी प्रत्येक जण सुखावला होता. प्रस्थान सोहळ्यासाठी सकाळपासूनच लगबग सुरू होती. दुपारी दोनच्या सुमारास या शाही सोहळ्यास सुरुवात झाली. गंध, पुष्प, अत्तर, चंदनउटीच्या सुगंधाने भजनीमंडप सुगंधीत झाला होता. वीणेकरी, फडकरी, सेवेकरी आणि मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत कोथरूडचे ग्रामोपाध्याय सुभाष टंकसाळे यांनी पौरोहित्य केले. गणेशपूजा, कलशपूजा, वरुणपूजा, पृथ्वीपूजा आदी देवतांच्या पूजा झाल्यानंतर चांदीच्या पादुकांची विष्णुसुक्‍ताच्या मंत्रध्वनीत मान्यवरांच्या हस्ते यथासांग पूजा संपन्‍न झाली. त्यानंतर प्रस्थान सोहळा सुरू झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट व गिरिजा बापट यांच्यासह यावर्षी पुण्याच्या नवी पेठेतील वारकरी सदाशिव भोळे यांना पूजेचा मान मिळाला.

सोहळ्याच्या सुरुवातीस तुकोबांच्या पादुका चांदीच्या पालखीत ठेवण्यात आल्या. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या ध्वनीने भजनी मंडप दुमदुमला, तसा देऊळवाड्यात नीरव शांततेला भेदणारा वारकर्‍यांचा एकच गलका झाला. टाळ-मृदुंगाचा एकच ठेका वाजला. देहभान विसरून वारकरी नाचू-गाऊ लागले. दुपारी चारच्या सुमारास भजनी मंडपातून पालखीचे देऊळवाड्यात आगमन झाले. पुढे बाभूळगावकरांचा देवाचा घोडा, त्यापाठोपाठ मोहिते-पाटलांचे मानाचे अश्‍व, गरुडटक्के घेतलेले सेवेकरी, हातात चोप घेतलेले कानसूरकर, गिराम, खैरे हे चोपदार त्यामागे मानकर्‍यांनी खांद्यावर घेतलेली फुलांनी सजविलेली पालखी, असा शाहीसोहळा डोळ्यांचे पारणे फेडीत होता. पालखीतील पादुकांवर भय्यासाहेब कारके चवरी ढाळत होते. पालखीवर अब्दागिरी धरण्यात आली होती. पुढे मानाच्या दिंडीचा खेळ सुरू होता.

रमत-गमत सोहळा पुढे सरकत होता. देऊळवाड्यात मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे दोन तास लागले. परंपरेप्रमाणे सोहळ्याचा पहिला मुक्‍काम श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळघर असलेल्या इनामदारसाहेब वाड्यात होता. तेथे पाथरूडकर दिंडीने कीर्तन आणि विंचूरकर दिंडीच्या वतीने जागर करण्यात आला.

गुरुवारी पहाटे मुख्य मंदिरात श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ ऊर्फ बाळासाहेब मोरे, पालखी सोहळाप्रमुख सुनील दामोदर मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे यांच्या हस्ते श्री पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर शिळामंदिर, वैकुंठस्थान मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीचे पूजन पालखीसोहळा प्रमुख आणि विश्‍वस्तांच्या हस्ते झाले. मंदिरातील हरिनाम सप्ताहाची सकाळी अकरा वाजता सांगता झाली.