होमपेज › Satara › ‘पुढारी’कारांच्या पुण्यतिथीदिनी सामाजिक योगदानाचे कौतुक : ‘एहसास’लाही मदतीचा हात 

‘पुढारी’च जनतेचा लीडर : संदीप पाटील 

Published On: May 20 2018 10:32PM | Last Updated: May 20 2018 10:31PMसातारा : प्रतिनिधी

‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांचे सामाजिक योगदान निश्‍चितच प्रेरणादायी आहे. ‘पुढारी’च खर्‍या अर्थाने जनतेचा लीडर आहे. सातारच्या टीम ‘पुढारी’ने डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथीदिनी दरवर्षी राबवलेले उपक्रम स्तुत्य असून ही सामाजिक कृतज्ञता आदर्शवत आहे, अशा शब्दांत जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी ‘पुढारी’कारांना अभिवादन केले. दरम्यान, आबांच्या पुण्यतिथीनिमित्त सातार्‍याच्या ‘पुढारी’ परिवाराने मतिमंद मुलांना मायेची ऊब देत सामाजिक बांधिलकीचा वसा यावर्षीही जपला. वळसेच्या ‘एहसास’ मतिमंद शाळेतील मुलांसाठी ‘पुढारी’ परिवाराच्या वतीने शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. 

‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन सातार्‍याची ‘टीम पुढारी’ विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. यावर्षीही ही विधायकता जोपासण्यात आली.  प्रारंभी दै. ‘पुढारी’च्या सातारा कार्यालयात ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून  अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, कार्यालय अधीक्षक सचिन कदम यांच्यासह ‘पुढारी’ परिवार उपस्थित होता. 

यावेळी बोलताना संदीप पाटील म्हणाले, निर्भीड अन् बेडर असणारा ‘पुढारी’ तितकाच संवेदनशील आहे,  याचा प्रत्यय अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आला आहे. ‘पुढारी’कारांचा वारसा सातारच्या टीमने खर्‍या अर्थाने जपला आहे. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने ही कृतज्ञता मला पुन्हा पहायला मिळाली.  हे दैनिक खर्‍या अर्थाने लीडर आहे. त्यांची टीमही लीडरच आहे. मलाही लहानपणापासून ‘पुढारी’ वाचण्याची सवय जडली असल्याचेही संदीप पाटील यांनी आवर्जून स्पष्ट केले.

दरम्यान, ‘पुढारी’ कार्यालयातील अभिवादन कार्यक्रमानंतर सातारा तालुक्यातील वळसे येथील ‘एहसास’ मतिमंद मुलांच्या बालगृहाला ‘पुढारी’ परिवाराने भेट देऊन शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी फळे, खाऊ  वाटपही करण्यात आले.  

यावेळी बोलताना हरीष पाटणे म्हणाले, आदरणीय आबांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीच दै. ‘पुढारी’ कार्यालयाकडून विधायक उपक्रम राबवले जातात. आबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचा आदर्श आमच्यासमोर ठेवला. त्या जाणीवेतूनच आम्ही सर्व सहकारी पत्रकारितेत कार्यरत आहोत. 

‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधवसाहेब व व्यवस्थापकीय संपादक योगेशदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सातार्‍याचा ‘पुढारी’ परिवार समाजहिताचे अनेक उपक्रम राबवत आहे. ‘एहसास’ मतिमंद शाळेला जागेची अडचण असल्याचे सांगण्यात आले. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी ‘पुढारी’ निश्‍चितपणे पाठपुरावा करेल. यानिमित्ताने दानशुरांना आम्ही आवाहन करत आहोत. शाळेला जाणवणार्‍या अन्य अडचणींबाबतही ‘पुढारी’ची नेहमीच सहकार्याची भावना राहिल, असेही त्यांनी नमूद केले. 

यावेळी ‘एहसास’चे प्रमुख संजय कांबळे म्हणाले, आपणासह येथील कर्मचार्‍यांनी मतिमंद मुलांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. आम्हाला दै.‘पुढारी’सारख्या अग्रगण्य वृत्तपत्राची व ‘टीम पुढारी’ परिवाराची नेहमीच साथ लाभत आली आहे. आमच्या शाळेतील मतिमंद मुलांनी गोंदिया येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. या गुणवंतांच्या पाठीशी समाजाचे बळ राहिले पाहिजे. अनेक अडचणी आहेत, मार्गक्रमण सुरू आहे. सध्या भाडेतत्वावरील जागेत ही शाळा सुरू आहे. कोणतेही अनुदान नाही. हक्‍काची जागा मिळाली तर या मुलांसाठीचे कार्य आणखी नेटाने करता येईल. 
कार्यक्रमाची सुरुवात ‘इतनी शक्‍ती हमे दे ना दाता’ या प्रार्थना गीताने झाली. त्यानंतर ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मतिमंद मुलांनी सर्व ‘टीम पुढारी’ परिवाराचे स्वागत केले. सोनाली वाघ यांनी सूत्रसंचालन केले. 

तुम्ही निर्भीडपणे लिहिता म्हणून आम्हीही बेडरपणे कारवाया करतो 

संदीप पाटील यांनी टीम ‘पुढारी’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ते म्हणाले, सातार्‍याच्या गुन्हेगारी निर्मूलनाचा कृतीयुक्‍त आराखडा तयार करण्यात आला. जनतेने, सामान्य नागरिकांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारींचा विचार करून त्यांना न्याय देण्याचे काम पोलिसांनी हातात घेतले. खासगी सावकारी हा विषय ज्वलंतपणे समोर आला आणि सातारा जिल्ह्याच्या गुन्हेगारीचे सगळे मूळ इथेच दडले आहे हे लक्षात आल्यानंतर हा सगळा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यात ‘पुढारी’ने मला व माझ्या टीमला दिलेली साथ व शाबासकी कायम प्रेरणादायी ठरली. कारवायांना सर्वात जास्त प्रसिद्धी देऊन ‘पुढारी’ने पोलिसांवरील विश्‍वास जनतेसमोर आणला. त्यामुळे निर्भीडपणे जनता तक्रारींसाठी समोर येऊ लागली. तुम्ही निडरपणे लिहित राहिला त्यामुळे मी व माझी टीम बेडरपणे कारवाया करत राहिलो. अजून बरेच काम बाकी आहे. सातारा जिल्ह्याच्या गुन्हेगारी निर्मूलनाच्या या सेवाभावी कार्यात ‘पुढारी’ने अशीच मैत्रीची साथ ठेवावी, अशी अपेक्षाही संदीप पाटील यांनी व्यक्‍त केली.