Mon, Jun 01, 2020 04:56होमपेज › Satara › सलग सुट्ट्यांमुळे तोबा गर्दी; गुलाबी थंडी व निसर्गाचा लुटला मनमुराद आनंद

म’श्‍वर, पाचगणी बहरले; पर्यटक सुखावले

Published On: Dec 24 2017 6:02PM | Last Updated: Dec 24 2017 6:03PM

बुकमार्क करा

महाबळेश्‍वर/पाचगणी: वार्ताहर

नाताळ सणाबरोबरच आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्‍वर व पाचगणी ही जगप्रसिध्द पर्यटन स्थळे बहरली आहेत. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने शनिवारपासूनच या परिसरात पर्यटक तळ ठोकून आहे. या पर्यटनस्थळावरील विविध पॉईंट व अन्य प्रेक्षणीय ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पर्यटकांचे फेवरेट डेस्टिनेशन असणार्‍या वेण्णा लेक, लिंगमळा, टेबल लँड आणि सिडने पॉईंट परिसरात गर्दी वाढू लागली आहे. 

शनिवार, रविवारची सुट्टी आणि नाताळमुळे राज्य व देशभरातून महाबळेश्‍वर, पाचगणीत पर्यटक गर्दी करू लागले आहे. ऐन हिवाळ्याच्या हंगामात सलग सुट्टी आल्याने महाबळेश्‍वरची गुलाबी थंडी आणि निसर्गाचा मनमुराद आनंद पर्यटक लुटत आहेत.  तसेच वेण्णा लेक परिसरात नौकाविहाराचा आनंद लुटण्यासोबतच पर्यटक चटपटीत व चमचमीत पदार्थांवर ताव मारत आहेत. 

हॉटेल व्यावसायिकांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईसह पर्यटकांसह युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी विविध थीम्स आणि डीजे नाईट या सारख्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या आहेत. बाजारपेठेत आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने बाजारपेठेला नवी झळाळी मिळाली आहे. या आठवणी लक्षात रहाव्यात, यासाठी पर्यटक सेल्फी घेताना दिसत आहेत.

महाबळेश्‍वर व परिसरातील प्रसिद्ध ऑर्थरसीट, केटस्, लॉडविक, विल्सन, प्रसिद्ध मुंबई पॉईन्ट या प्रेक्षणीय स्थळांसह लिंगमळा धबधबा परिसर गर्दीने फुलून गेला आहे. ऐन थंडीतदेखील पर्यटक येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी ज्यूूस, क्रीम, आईसक्रीम, आईस गोळ्यावर ताव मारताना दिसत आहेत. वेण्णालेक, मुंबई पॉईंट या परिसरामध्ये पर्यटक घोडेसवारीचादेखील आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत.

सकाळपासूनच  पसरणी घाटात दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दांडेघर नाका, जुने पोलिस स्टेशन, बस स्थानक या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

दरम्यान, पर्यटक पाचगणीचे वैभव असणार्‍या टेबल लॅन्ड येथे आर्वजून भेट देत आहेत. या ठिकाणी घोड्यांची सवारी करण्याचा पर्यटक आनंद घेत आहेत. याबरोबरच सिडने पॉईट, फारशी पॉईंटवरही गर्दी होऊ लागली आहे. उंच ठिकाणावरुन निसर्गाची किमया व सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये भारावून जाणारा निसर्ग सदैव पर्यटकांना भुरळ घालत आहे. 

जिभेवर रेंगाळणारी स्ट्रॉबेरीची चव व मक्याच्या मसाल्यासह चाखताना पर्यटक भारावून जात आहेत. सलग सुट्ट्या असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिस तैनात  करण्यात आले आहेत. दरम्यान, सोमवारी नाताळ असल्याने पर्यटकांचा मुक्‍काम आजही असणार आहे. पाचगणी व महाबळेश्‍वरमध्ये नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यासाठी विविध चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गर्दी होणार आहे तर आपल्या जवळच्या आप्‍तेष्टांना भेट देण्यासाठी गिफ्टची दुकाने फुल्‍ल झाली आहेत.