Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Satara › पीआरसीला झेडपीकडून अहवाल सादर

पीआरसीला झेडपीकडून अहवाल सादर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या महाराष्ट्र विधानमंडळाची पंचायत राज समिती (पीआरसी) दि. 11 ते 13 एप्रिल रोजी सातारा जिल्हा परिषदेला भेट देणार येणार असल्याने झेडपीतील सर्व विभागात  सध्या दररोज बैठकांचा धडाका सुरू आहे. सोमवारी वार्षिक प्रशासन अहवालवरील प्रश्‍नावलीचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनामार्फत महाराष्ट्र विधानमंडळाकडे सादर करण्यात  आला.

पंचायत राज समिती जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी यासह विविध विभागांना भेट देवून पाहणी करणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग अलर्ट झाले आहेत. सन 2012 व 13चे लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच सन 2013 व 14 च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात पीआरसी सातारा जिल्हा परिषदेत भेट देवून मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर सर्व संबंधित अधिकारी यांची साक्ष घेणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागात सध्या दररोज बैठकांचा धडाका सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेवून प्रश्‍नावली व परिच्छेदांवर चर्चा केली. त्यानंतर सर्व विभागाची प्रश्‍नावली व स्थानिक निधी लेखा विभागाने सुमारे 145 परिच्छेदांचे पुस्तक तयार केलेे. हे पुस्तक सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तयार झाले.

त्यानंतर तत्परता दाखवत महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायत राज समितीला हे पुस्तक देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  सत्यजीत बडे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी वि. तु. पाटील यांच्यासह अन्य अधिकारी मुंबईला गेले व मंत्रालयात समितींच्या सचिवांकडे ही पुस्तके सादर केली. त्यांनतर झेडपीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. मात्र, दि. 11 ते 13 एप्रिल रोजी समिती दौर्‍यावर येत असल्याने आणखी काय काय प्रश्‍न विचारणार, याबाबतची उत्सुकता लागून राहिली आहे.पंचायत राज समितीने ज्या ज्या विभागाची माहिती मागवली आहे. त्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे व  सामान्य  प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी खातेप्रमुख व गटविकास अधिकार्‍यांची बैठक घेवून योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच विविध विभागाची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडे देण्याच्या सूचना दिल्या.

Tags : satara, satara news, PRC, submit report, from ZP


  •