Fri, Jul 19, 2019 19:52होमपेज › Satara › पीआरसीच्या नावाखाली अधिकारी झाले बडे

पीआरसीच्या नावाखाली अधिकारी झाले बडे

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 1:15AMसातारा : प्रतिनिधी

पंचायत राज समितीच्या नावाखाली सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतून मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा करण्यात आली. पीआरसीमधील आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी जिल्हा परिषदेने लाखो रुपयांचा चुराडा केल्याचे बोलले जात आहे. पीआरसीचे नाव पुढे करून अनेकांनी आपले उखळ पांढरे केले असून त्यामध्ये काही अधिकारी ‘बडे’ झाले आहेत. 

महाराष्ट्र राज्य विधान मंडळाची पंचायत राज समिती दि. 11 ते 13  या कालाधीत सातारा जिल्हा दौर्‍यावर आली होती. समितीमधील काही अभ्यासू सदस्यांनी पहिल्यापासूनच वातावरण टाईट ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी गोंधळून गेले. पहिल्याच दिवशी समितीमधील सदस्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना घाम फोडला. त्यामुळे सदस्य व सदस्यांबरोबर आलेल्यांचे आदरातिथ्य करणेही तितकेच गरजेचे वाटल्याने अधिकारी व कर्मचारी सदस्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच उठाठेव करताना दिसत होते. 

समितीच्या प्रत्येक आमदारासाठी जिल्हा परिषदेने जनसंपर्क अधिकार्‍यांच्या नेमणुका केल्या होत्या. तसेच या आमदाराच्या पाहुणचारासाठी आलिशान इनोव्हा गाड्या बुक केल्या होत्या. ज्या प्रमाणे  लग्नात वर्‍हाड आणण्यासाठी मुला-मुलींकडून नातेवाईकांना पाठवले जाते त्या पध्दतीने बहुतांश अधिकारी या समितीतील सदस्यांना आणण्यासाठी गेले होते. तसेच पंचायत राज समितीमधील सर्वच सदस्य दुसर्‍यादिवशी थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्‍वरमधील राजभवनासह अलिशान हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते. 

पीआरसी दौर्‍यावर येणार असल्याने तीन दिवसांच्या कालावधीसाठी तब्बल 25 हून अधिक चार चाकी गाड्या बुक केल्या होत्या. या समितीमध्ये एकूण 22 सदस्य होते. त्यामुळे प्रत्येक आमदारासाठी एक स्वतंत्र गाडी देण्यात आली होती.काही आमदारांनी आपल्याच मतदारसंघातून 4 ते 5 चार चाकी गाड्या सातार्‍यात सोबत आणल्या होत्या. यामध्ये त्यांचे कार्यकर्तेही आले होते. पीआरसीचा दौरा सुरू होण्यापूर्वीच ही मंडळी कोकण आणि घाट माथ्यावरून फिरून आली होती. या सदस्यांचा गाडी, हॉटेल आणि इतर असा हा सर्व खर्च जिल्हा परिषदेने केला. 

एक अतिथी म्हणून जिल्हा परिषदेने आपले पाहुणचाराचे कर्तव्य पार पाडले. पीआरसी दौरा विनाविघ्न पूर्ण व्हावा, यासाठी काही अधिकारी स्वत:हून पुढे झाले होते. त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. ज्या समितीवर लाखो रूपयांनी खर्च केला. त्यामध्ये जिल्हा परिषदेमधील जबाबदारी घेणार्‍या काही  बड्या अधिकार्‍यांनीही आपले खिसे गरम केले असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे. याबाबतचे पुरावेही काही कर्मचार्‍यांनी दैनिक ‘पुढारी’कडे दिले आहेत. 

सातारा जिल्हा परिषदेचा देशासह राज्यात नावलौकिक आहे. मात्र पीआरसीच्या नावाखाली विविध विभागातून गोळा केलेल्या  वर्गणीमुळे  झेडपीला गालबोट लागले आहे.ज्यांनी झेडपीमध्ये असे उद्योग केले आहेत अशा अधिकार्‍यांना पदाधिकार्‍यांनी वेळीच जरब घालणे गरजेचे आहे. पारदर्शकपणाचा आव आणणार्‍या असल्या प्रवृत्तीना वेळीच रोखले नाही तर जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे.

Tags :  satara zp, PRC