Tue, Apr 23, 2019 09:55होमपेज › Satara › ‘पीसीआर’च्या व्हॉटस् अ‍ॅपमुळे हुल्लडबाजांना जोरदार दणका

‘पीसीआर’च्या व्हॉटस् अ‍ॅपमुळे हुल्लडबाजांना जोरदार दणका

Published On: Jul 21 2018 10:35PM | Last Updated: Jul 21 2018 10:01PMपरळी  : वार्ताहार

ठोसेघर धबधबा परिसरातील मुख्य प्रवेशद्वारावर तिकीट शुल्क आकारण्यासाठी तैनात असणार्‍या महिला कर्मचार्‍यांना गोडोली येथील युवकांच्या एका गटाने शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली. दरम्यान, त्याठिकाणी उपस्थित असणार्‍या एका दक्ष पर्यटकाने संबंधित युवकांच्या गाडीचे फोटो पीसीआरच्या वॉटस् अ‍ॅप ग्रुपवर टाकल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी त्या युवकांच्या मुसक्या आवळल्या. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी गोडोली येथील युवकांचा एक गट पर्यटनासाठी तीन ते चार दुचाकीवरून ठोसेघर येथे आला होता. त्यापैकी एकजण सिगारेट ओढत तिकीट शुल्क आकारणीच्या खिडकीजवळ गेला असता त्या ठिकाणी तैनात असणार्‍या महिला कर्मचार्‍यांनी या ठिकाणी सिगारेट ओढण्यास बंदी आहे. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न केला असता त्या युवकाने महिलेला शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरूवात केली. हा प्रकार ठोसेघर येथील स्थानिक नागरिकांना कळाल्यानंतर काहीजणांनी घटनास्थळी जावून संबंधित युवकांना समजवण्याचा प्रयत्न केला असता युवकांनी त्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरूवात करत सातार्‍यातील एका बड्या नेत्याचे नाव घेवून तुम्हाला काय करायचे ते करा? असा आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांना सांगा अथवा कोणालाही सांगा आम्ही कोणाला भित नाही, अशा शब्दात संबंधित युवकांनी आणखीनच गदारोळ करण्यास सुरूवात केली. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असणार्‍या एका पर्यटकाने या युवकांच्या दुचाकींचे फोटो काढून पीसीआरच्या वॉटसअ‍ॅप ग्रुपवर टाकत पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच पीसीआर ठोसेघरकडे रवाना झाली. दरम्यानच्या काळात संबंधित युवक दुचाकी घेवून सातार्‍याच्या दिशेने जात होते. बोरणे घाटाच्या पलिकडे पीसीआरमधील कुंभार आणि काळे या दोन पोलिस कर्मचार्‍यांना  वॉटसअ‍ॅपवर टाकलेल्या फोटोतील दुचाकी सातारच्या दिशेने जात असल्याचे निर्दशनास आले. त्यांनी या दुचाकी तत्काळ थांबवून युवकांची विचारपूस केली असता असे काही घडलेच नाही, असा पवित्रा त्या युवकांनी घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्यातील दोघांना पीसीआरमध्ये बसवून तर अन्य युवकांना आपल्या दुचाकी घेवून  ठोसेघरकडे येण्यास सांगितले.

ठोसेघर येथील धबधबा प्रवेशद्वाराजवळ या सगळ्यांना घेवून आल्यानंतर संबंधित महिला कर्मचार्‍यांनी त्या युवकांविरोधात शिवीगाळ व दमदाटी केल्याची तोंडी तक्रार केली. तक्रारीनंतर मात्र संबंधित युवक पोलिसांच्या हातापाया पडू लागले. परत असे घडणार नाही. आम्हाला एकदा माफ करा, असा बचावपणाचा पवित्रा घेतला. मात्र, ठोसेघरमधील काही नागरिकांनी त्या युवकांपैकी दोन युवक दमदाटीची आणि बघून घेण्याची भाषा बोलत होते. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी केल्यानंतर पोलिसांनी संबंधित दोन युवकांना  रात्री उशीरा तालुका पोलिस स्टेशनला आणले. 

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ठोसेघर धबधब्यावर अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असताना याठिकाणी नियुक्त असलेले वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी फिरकत  नसल्याच्या तक्रारी प्राप्त होवू लागल्या आहेत.