Thu, Jun 27, 2019 00:06होमपेज › Satara › धोम कालव्यात मृत्यूचे तांडव

धोम कालव्यात मृत्यूचे तांडव

Published On: May 22 2018 10:40PM | Last Updated: May 22 2018 10:38PMवाई/ओझर्डे : प्रतिनिधी

धोम धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा वेगवेगळ्या ठिकाणी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने वाई शहर हादरून गेले आहे. यश सुभाष दाभाडे (वय 13, रा. बावधन), रंगदास शामराव सळमाके (वय 20, मूळ रा. पवनी आमगाव, भंडारा, सध्या रा. शेंदुरजणे, वाई) व रमेश विनायक जाधव (वय 28, रा. खानापूर, ता. वाई) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, या सर्व घटना सोमवारी व मंगळवारी घडल्या असून, सलग दोन दिवसांत तिघांचा बुडून मृत्यूचे तांडव झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (दि. 21) यश दाभाडे हा धोम उजव्या कालव्यात सुतारी नावाच्या शिवारात सकाळी 9 वाजता चार मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. पोहता नीट येत नसतानाही तो पाण्यात उतरला. दुर्दैवाने या घटनेत तो बुडाला व वाहून गेला. यश बुडाल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. तो पाण्यात वाहून गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाण्यामध्ये शोधमोहीम घेण्यास सुरुवात झाली. मात्र, मंगळवारी (दि. 22) त्याचा मृतदेह बावधन गावच्या हद्दीत मायनर क्र. 4 जवळ सापडला. दरम्यान, याबाबतची खबर त्याचा चुलत भाऊ अमोल दाभाडे यांनी दिली. यश याने नुकतीच सातवीची परीक्षा दिली असून तो इयत्ता आठवीला गेला आहे. बावधन येथेच जिल्हा परिषदेच्या शाळेत तो शिकत होता. यश हा आई-वडिलांना एकुलता एक होता. या दुर्दैवी घटनेने त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

रमेश जाधव (रा. खानापूर) हा युवकही सोमवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घरात धोम डाव्या कालव्याच्या धुमाळवाडी गावच्या हद्दीतून पोहण्यासाठी जात असल्याचे सांगून गेला होता. उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. रात्री त्याची वाट पाहून अखेर कुटुंबीयांनी वाई पोलिस ठाण्यात धाव घेतली. रमेश जाधव हा बेपत्ता झाल्याची तक्रार आनंद जाधव यांनी पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान, धोम कालव्यात युवक बुडाला असल्याची माहिती समोर आली. मंगळवारी बोपेगावच्या हद्दीत एक मृतदेह सापडल्याचे समोर आले. युवकाचा मृतदेह सापडल्यानंतर तो रमेश जाधव असल्याचे समोर आले व पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रमेश शेती करत होता. त्याच्या पश्‍चात आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये रंगदास सळमाके हा     युवक मूळचा आमगाव, जि.चंद्रपूर येथील आहे. सध्या तो मॅप्रो फूड्स, शेंदुरजणे या कंपनीत कामास होता. कामानिमित्त शेेंदुरजणे येथे गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास मित्रांसमवेत धोम डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यासोबत वाहून गेला. प्राथमिक माहितीनुसार त्याच्या मित्रांना त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. रंगदास याचा शोध घेण्यास सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कवठे केंजळ उपसा जलसिंचन केंद्र परिसरात येथे मृतदेह सापडला. याबाबतची अविनाश जगुनाके यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. चंदपूर येथून त्याचे कुटुंबीय निघाले असून रात्री उशीरायर्पंत ते पोहोचले नव्हते.दरम्यान, वाई तालुक्यात या घटनेनंतर पोहणार्‍या युवकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.