Mon, Mar 25, 2019 13:48होमपेज › Satara › वर्षभरच भाजपचे सरकार : पृथ्वीराज चव्हाण 

वर्षभरच भाजपचे सरकार : पृथ्वीराज चव्हाण 

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 03 2018 11:05PMकराड : प्रतिनिधी

कराडात नगरसेवकांनी विश्‍वासघात केल्याचे सांगत कोणी आपल्या अडचणी तर कोणी आरक्षण उठवण्यासाठी भाजपाकडे जात आहे. मात्र वर्षभरच भाजपाचे सरकार आहे. आता मुख्यमंत्री सर्वांनाच क्लिन चिट देत आहेत. त्यामुळेच तक्रार करूनही काही उपयोग होत नाही. मात्र आपण लोकांच्या तक्रारींबाबत माहिती घेत असून प्रसंगी न्यायालयातही दाद मागण्याचे स्पष्ट संकेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.कराडमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना आ. चव्हाण यांनी कराड नगरपालिकेबाबत मनात असलेली खंत बोलून दाखवली.

आ. चव्हाण म्हणाले, मी नगरपालिका राजकारणात कधीच पडलो नव्हतो. मात्र 2016 ची निवडणूक लढवताना आपले नेतृत्व पुढे करून आघाडी करण्यात आली होती. लोकांसमोर या आघाडीच्या माध्यमातून जाऊन बहुमतही मिळवले. मात्र त्यानंतर नगरसेवकांनी विश्‍वासघात केला. मी नगरपालिकेला भरपूर निधी दिला होता. लोकांकडून या कामांच्या दर्जाबाबत तक्रारी कानावर पडतात. त्यामुळेच या तक्रारीबाबत आपण माहिती घेत आहोत. 

राज्यात मुख्यमंत्री राजकारण लक्षात घेत सर्वांनाच क्लिन चीट देत आहेत. कराडमध्येही काहीजण न्यायालयात गेले होते. मात्र मंत्र्यांनी अधिकारांचा वापर करत काहींना अभय दिले आहे. जर शासनच चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत असेल तर काय होईल ? असा प्रश्‍न उपस्थित करत आपण माहिती घेत असून भाजपाचे सरकार वर्षभरच सत्तेवर आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आमचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचे सांगत आ. चव्हाण यांनी विरोधकांना अप्रत्यक्षरित्या इशाराच दिला आहे.

दरम्यान, मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक ही विकासकामांवरच होणार आहे. नगरपंचायतीची नगरपालिका झाली असती, तर वाढीव निधी मिळाला असता. मात्र राजकारण डोळ्यासमोर ठेऊन नगरपंचायतीची नगरपालिका होण्यास विरोध केला जात आहे. त्यामुळे मलकापूरला नगरपालिका म्हणून मिळणारा जादा निधी आता मिळणार नाही. म्हणून विकासकामांना कोण विरोध करत आहे? हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहनही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केले.  

राज्यमंत्री, छे... त्यांना कसले अधिकार ?...

भाजपने कराड दक्षिणमध्ये दोन राज्यमंत्रीपदे दिल्याकडे लक्ष वेधले असता आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मी मुख्यमंत्री होतो. त्यामुळे कोणाला काय अधिकार असतात? याची जाणीव आपणास आहे. अशा राज्यमंत्र्यांना कसले अधिकार? असा उपरोधिक प्रश्‍न आ. पृृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच दोनच काय पण, आणखी तीन ते चार जणांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला तरी काहीही फरक पडणार नाही, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.