Sat, Apr 20, 2019 08:12होमपेज › Satara › धावडवाडीच्या हायटेक कंपनीविरोधात उद्रेक

धावडवाडीच्या हायटेक कंपनीविरोधात उद्रेक

Published On: Aug 15 2018 1:26AM | Last Updated: Aug 15 2018 12:32AMखंडाळा :  वार्ताहर    

धावडवाडी, ता. खंडाळा येथील हायटेक प्लास्ट कंपनीने गेल्या 2 ते 3 वर्षांपासून काम करत असणार्‍या महिला कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आल्याने कामगारांमधील उद्रेेक उफाळून आला आहे. कंपनीच्या गेटसमोर महिला कामगारांनी ठिय्या टाकला असून सोमवारी रात्रभर या महिला कंपनीसमोर बसून राहिल्या. असे असताना कंपनी व्यवस्थापनाने मात्र कंपनीत जाणार्‍या-येणार्‍या कामगारांना अटकाव केल्याप्रकरणी उलट कामगारांवरच गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी दोन पुरुष व नऊ महिलांना पोलिसांनी अटकही केली आहे.

धावडवाडी येथील हायटेक प्लास्ट कंपनीतील कामगारांवर व्यवस्थापनाकडून अन्याय  झाल्याची भावना आहे. येथील महिला कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून लेबर काँन्ट्रक्ट व इतर कारणावरून वाद आहेत. या वादावरून महिला कामगारांनी कंपनीच्या गेटवर बसून ठिय्या मांडला आहे. त्याआधी लेबर काँट्रॅक्टमध्ये काम करणार्‍या महिला कामगारांना कामावरून काढून टाकल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घ्यावे व इतर मागण्याकरता त्यांनी तहसीलदार कार्यालय खंडाळा येथे 15 दिवस उपोषण केलेले होते. उपोषणादरम्यान तहसीलदार विवेक जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक हणमंत गायकवाड  यांनी कामगारांच्या 5 ते 6 वेळा बैठकी घेऊन त्यांच्या मागण्या सनदशीर मार्गाने सोडवून घेण्याचे आवाहन केले  होते. तसेच आ. मकरंद पाटील, कृषी सभापती मनोज पवार, तहसीलदार विवेक जाधव, आणि कंपनी व्यवस्थापन  व उपोषणकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या आश्‍वासनानंतर महिला कामगारांनी उपोषण सोडले होते. मात्र त्यानंतरही कंपनी व्ववस्थापनाकडून कामगारांबाबत कोणतीही सकारात्मक कार्यवाही न झाल्याने संबंधित कामगारांनी पुन्हा कंपनीसमोर ठिय्या टाकला. त्यातून पुन्हा हा वाद उफाळला आहे. 

कंपनीचे कॉलिटी ऑफिसर विजय देशमुख यांनी मात्र कामगारांवरच तक्रार दाखल केली आहे. कामावर घेण्याच्या कारणावरून तक्रारदार व कंपनीत जाणार्‍या व कंपनीतून बाहेर येणार्‍या कामगारांना शिवीगाळ व दमदाटी करून कंपनीत जाण्यास अटकाव करणे व कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी तक्रारीम म्हटले असून याप्रकरणी पोलिसांनी अकरा कामगारांना अटकही केली आहे. खंडाळा पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल आहे. या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय धुमाळ हे करत आहेत.