Sat, Jul 20, 2019 02:38होमपेज › Satara › महाबळेश्‍वरात १८ ते २० मेअखेर मधमाशा महोत्सवाचे आयोजन

महाबळेश्‍वरात १८ ते २० मेअखेर मधमाशा महोत्सवाचे आयोजन

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 10:12PMसातारा : प्रतिनिधी

जागतिक मधमाशा दिनानिमित्त  मध संचालनालय महाबळेश्‍वर यांच्यावतीने दि. 18 ते 20 मे अखेर मधमाशा महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालक ध्रुवकुमार बनसोडे यांनी दिली.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल  चोरडीया व मंडळाच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ निलिमा केरकट्टा यांच्या मार्गदर्शनाखाली  होणार्‍या महोत्सवात दि. 18 रोजी मधमाशापालन साहित्य प्रदर्शन  व  मधुबन विक्री केंद्राचे उदघाटन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनील बोरकर, मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, जि.प.चे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे, मधुसागर मध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. मिलिंद वाकोडे यांचे  मधमाशापालन उद्योगात असणारा वाव, डॉ. एस.एस. पाटील यांचे मधमाशी एक समृध्द किटक आणि आर.पी. नारायणकर हे  मधमाशा पालन आणि संशोधन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

दि. 19 रोजी  केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन केंद्राच्या  डॉ. लक्ष्मी राव या राज्यात मधमाशापालनास उपयुक्त फुलोरा, डी. आर. पाटील यांचे  सेंद्रिय मध संकलन व प्रतवारी, बिपीन जगताप यांचे मधमाशापालन एक उद्योग या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

दि. 20 रोजी सकाळी मध उद्योगातील  उद्योजकांच्या यशोगाथा या विषयावर चर्चासत्र आयोजित केले असून त्यामध्ये मध उद्योगातील  यशस्वी  मधपाळ सहभागी होणार आहेत. तसेच राज्यातील यशस्वी मधपाळांचा सन्मान पालकमंत्री ना. विजय शिवतारे, सभापती विशाल चोरडीया, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते होणार आहे. मधमाशा महोत्सवात राज्यातील चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, लातुर, उस्मानाबाद,  पश्‍चिम महाराष्ट्रातील  सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील मधपाळ उपस्थित राहणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.