होमपेज › Satara › बांधकाम, खजिना विभागाला ‘डेडलाईन’

बांधकाम, खजिना विभागाला ‘डेडलाईन’

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:31PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाला तीच यंत्रणा वापरून दोन्हीही उत्सवांवर प्रचंड खर्च झाल्याचे दाखवून सातारा पालिकेत लाखोंची बिले काढण्यात आली आहेत. बांधकाम विभागाने कृत्रिम तळे मुजवून भ्रष्टाचाराला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला असला तरी कागदोपत्री दाखवलेला खर्च संशयाच्या भोवर्‍यात आहे. आता नवरात्रोत्सवावर झालेल्या खर्चाचाही सविस्तर अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश नगराध्यक्ष सौ. माधवी कदम व उपनगराध्यक्ष राजू भोसले यांनी दिले आहेत.

सातारा नगरपालिकेने यावर्षी दगडी शाळा (सदरबझार), हुतात्मा स्मारक, कल्याणी शाळा परिसर या ठिकाणीही कृत्रिम तळी काढली होती. या तळ्यांच्या कामावर 7 लाख 78 हजार 850 रुपये खर्च झाला. या खर्चासह इतर साहित्यावर झालेल्या खर्चाची सुमारे 32 लाखांची बिले लेखा विभागातून काढण्यात आली आहेत. खर्चाचा अवाजवी तपशील सादर करण्यात आला आहे. अवास्तव खर्च दाखवून बिले काढली गेल्याचे स्पष्ट आहे. मात्र, यासंदर्भात ठोस हिशेब देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

पदाधिकार्‍यांनीही यासंदर्भातील सर्व तपशील मागवले आहेत. गणेशोत्सवासाठी जवळपास 4-5 मजूर संस्थांना कामे दिली गेली असून या संस्था नगरसेवक व काही सभापतींशी संबंधित आहेत. या संस्था खरोखर  अस्तित्वात आहेत किंवा कसे? संबंधित ठेका घेण्यासाठी या मजूर संस्था सक्षम होत्या का? याची माहिती घेतली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या खर्चात तफावत आढळली असतानाच नवरात्रोत्सवाच्या खर्चाचा मुद्दाही समोर आला आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवापाठोपाठ येणार्‍या नवरात्रासाठी नगरपालिकेने तीच यंत्रणा व बरेचशे साहित्यवापर्‍यात आले.

मात्र, त्याचा पुन्हा वेगळा खर्च दाखवला गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाबरोबरच नवरात्रोत्सवावर झालेल्या खर्चही सादर करण्याचे आदेश नगराध्यक्षा सौ. माधवी कदम व उपनगराध्यक्ष राजू भोसले यांनी दिले आहेत. दोन्हीही उत्सवांवर झालेल्या खर्चाचा तपशिल सादर करण्यासाठी आठ दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे. खर्चाची माहिती मिळाल्यावर प्रशासनाने कामाची अंदाजपत्रके फुगवून अवास्तव खर्च किती केला हे लक्षात येणार आहे.