Wed, Jul 17, 2019 00:21होमपेज › Satara › सत्तेमुळे बेभान झालेल्यांना चपराक 

सत्तेमुळे बेभान झालेल्यांना चपराक 

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 11:13PMखटाव : प्रतिनिधी 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेने चुकीच्या पद्धतीने केलेल्या नोकरभरतीविरोधात मी आवाज उठवला होता. सभापती आणि सहा आमदारांची ताकद आणि दबाव असूनही अखेर सत्याचाच विजय झाला. नोकरभरतीतून  कोट्यवधींची माया जमवून राजकारण करणार्‍यांना न्यायव्यवस्थेने चपराक दिली आणि गोरगरिबांच्या खर्‍या अर्थाने पात्र असणार्‍या मुला, मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेचे दरवाजे पुन्हा उघडले असल्याची प्रतिक्रिया आ. जयकुमार गोरे यांनी दिली.

राज्याच्या सहकार विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी सातारा जिल्हा बँकेने राबवलेली सेवक भरती प्रक्रिया रद्द करण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना आ. गोरे पुढे म्हणाले, बँकेत सेवक भरती करताना सत्ताधारी संचालक मंडळाने मनमानी कारभार केला होता. कोट्यवधींची माया गोळा करून पैसे दिलेल्या परीक्षार्थींची निवड करण्यात येऊन त्यांना नियुक्‍तिपत्रे देण्यात आली होती. खर्‍या प्रामाणिक आणि पात्र परीक्षार्थींना डावलण्यात आले होते. चुकीच्या सेवक भरती प्रक्रियेविरोधात मी विधिमंडळात तसेच प्रसारमाध्यमांसमोर आवाज उठवला होता. मुख्यमंत्र्यांनी तसेच सहकारमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. 

मात्र, सत्ताधारी संचालक मंडळाने सभापती आणि इतरांची ताकद वापरुन चौकशीच मॅनेज करण्याचा प्रयत्न केला होता. उच्च  न्यायालयाच्या आदेशानुसार  वरिष्ठ पातळीवरुन चौकशी झाल्यानंतर भरती प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने झाल्याचे समोर आले आणि सहकार विभागाच्या मुख्य सचिवांनी बँकेने केलेली सेवक भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

माझ्या आरोपांना उत्तर देताना मनाविरुद्ध कटपुतली झालेले बँकेचे चेअरमन नेहमीच  पारदर्शक कारभाराचे तुणतुणे वाजवायचे. जिल्हा बँकेतील ज्या संचालकांच्या खासगी बँका आहेत त्या बँकांचे दिवाळे निघाले आहे. आपली जिल्हा बँकही त्या मार्गाने जाऊ नये म्हणून माझी लढाई सुरु आहे. मी बँकेची प्रतिष्ठा जपण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. बँकेच्या अनागोंदी कारभाराबाबतचे प्रलंबित असणारे निकाल लवकरच लागतील आणि संचालक मंडळ तुरुंगात जाईल. सीसीटीव्ही, संगणक सॉफ्टवेअर, नोकरभरती  घोटाळ्यामुळे नाशिक बँक बरखास्त  झाली. सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची कुकर्मे तर त्यापेक्षा भयानक आहेत. त्यामुळे शासनाला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. सभापतीपदाचा दबाव फार काळ काळ कामी येणार नाही. बँकेच्या नोकरभरतीत गोळा केलेला कोट्यवधींचा पैसा जि. प. निवडणुकीत वापरण्यात आला. नोकरभरती निवडणुकांच्या नंतर असती तर निवडणुकांमध्येही वेगळे चित्र दिसले असते. 

चुकीच्या सेवक भरतीत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांचाही मोठा सहभाग आहे. कुटूंबातील तसेच ओळखीच्या व्यक्तींना नोकरी देण्यात त्यांचा सहभाग आहे. त्यांच्यावरही लवकरच फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे आ. गोरे यांनी सांगितले. संबधीत यंत्रणेवरही गुन्हा दाखल करण्यासाठी हायकोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पीएनबीसारखा घोटाळा होऊ नये म्हणजे झाले ...

सातारा जिल्हा बँकेचा अनागोंदी कारभार आणि चुकीच्या सेवक भरतीविरोधात मी आवाज उठवला की, चेअरमन थातूरमातूर स्पष्टीकरण देतात. आता तर अप्पर मुख्य सचिवांनी भरती प्रक्रिया रद्द केली आहे. आता नव्याने आणि पारदर्शीपणे संबंधित प्रक्रिया राबवावी लागणार आहे. आणखी काही उलटसुलट गोष्टी बँकेत घडत आहेत. पीएनबीसारखा महाघोटाळा आपल्या बँकेत होऊ नये म्हणजे मिळवली, असा टोलाही आ. गोरे यांनी लगावला.